जळगाव (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील पळासखेडे येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाहीय. मुलगी अल्पवयीन आहे. त्यामुळे पोलिस कायदेशीर कारवाई करतीलच, त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया माजी राज्य माहिती आयुक्त व्ही.डी.पाटील यांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलताना दिली आहे.
पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारी अर्जात पिडीत पित्याने म्हटले आहे की, मूलीला फूस लावून पळवून नेणारा स्वप्निल पाटील हा राज्याचे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा चुलत साला आहे. तसेच सेवानिवृत्त पोलिस अधिकारी देविदास पाटील व सेवानिवृत्त माहिती आयुक्त व्ही.डी.पाटील यांचा नातेवाईक असल्यामुळे पोलीस तपासात दिरंगाई करत आहे. स्वप्निलचे पोलिस व राजकीय क्षेत्रात नातेवाईक असल्यामुळे सदर प्रकरण दडपण्यात येत आहे, अशी माझी खात्री पटलेली आहे. तसेच जामनेर पोलिसांच्या तपासावर माझा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे मुलीस पळवून येणारा आणि या सर्व प्रकरणात मदत करणाऱ्यांची सुद्धा चौकशी व्हावी व माझ्या मुलीला परत मिळवून द्यावे, अशी विनंती केली आहे. या प्रकरणात पिडीत मुलीच्या वडिलांनी मुलीला पळवून नेण्यात मदत करणाऱ्यामध्ये गावातील काही लोकांची नावे घेतली आहेत. तर ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना सांगितले की, माझी मुलगी लहान आहे. आम्ही गरीब लोकं असल्यामुळे आमची कुणीही दखल घेत नाही. कुण्या मोठ्या माणसाबरोबर असं घडले असते तर पोलिसांनी तात्काळ आरोपीला उचलून आणले असते.
दरम्यान, मुलगी पळवून नेणारा मुलगा हा जरी माझा नातेवाईक असला तरी त्याचे हे कृत्य असमर्थनीय आहे. माझ्या संदर्भात सदर मुलीच्या वडिलांनी मुलाचा नातेवाईक आहे म्हणून त्याला पाठीशी घालण्यासाठी पोलिसांवर दबाव आणत आहे, असा जो आरोप केलाय तो चुकीचा आहे. तो त्यांचा गैरसमज आहे. मी त्या मुलाने जे कृत्य केले आहे त्याचे समर्थन मुळीच करू शकत नाही. त्यामुळे त्याला पाठीशी घालण्याचा अन् पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रश्नच नाही. मी पोलिसांवर दबाव आणतोय किंवा नाही याबाबत पोलिसच अधिक चांगले सांगू शकतील, असेही श्री. पाटील म्हणाले.