नवी दिली प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज पक्षाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. भाजपच्या या नव्या कार्यकारणीमध्ये पंकजा मुंडे व विनोद तावडे यांच्यासह राज्यातील आणखी दोन नेत्यांना राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याखेरीज खासदार हिना गावित यांचा समावेश राष्ट्रीय प्रवक्त्यांमध्ये करण्यात आला आहे.
भाजपचे राज्यातील मोठे नेते असलेल्या विनोद तावडे यांना विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी नाकारण्यात आली होती. तर पंकजा मुंडे यांना विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर पंकजा यांना विधानपरिषद अथवा राज्यसभेवर जागा देण्यात न आल्याने त्यांच्या नाराजीचे वृत्त होते.
दरम्यान, मुंडे व तावडे यांना पक्षातर्फे आज राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षातर्फे जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय सचिवांच्या यादीत १३ जणांचा समावेश असून यात राज्यातील सुनील देवधर आणि विजया रहाटकर यांचे देखील नाव आहे.
मुंडे व तावडे यांना पक्षाने संधी दिली असली तरी भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा डावलण्यात आले आहे. खडसे गेल्या बऱ्याच दिवसांपासून पक्षावर नाराज असून त्यांनी आपली नाराजी अनेकदा जाहीररीत्या बोलूनही दाखवली आहे. मात्र पक्षाच्या नव्या कार्यकारणीतही त्यांना कोणतीच जबाबदारी न देण्यात आल्यानं त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.
















