मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र पोलिसचे निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंह यांच्यावर २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावेळी जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल कसाब याचा मोबाईल लपवून ठेवल्याचा खळबळजनक आरोप पठाण यांनी केला आहे.
शमशेर पठाण यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं असून सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे या तक्रार अर्जात त्यांनी परमबीर सिंह यांनी २६/११ दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपवला होता अशी शंकाही व्यक्त केली आहे. परमबीर सिंह यांनी दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपवून ठेवला होता किंवा कुणाला तरी दिला होता असं त्यांनी म्हटलं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
परमबीर सिंह यांनी महाराष्ट्र एटीएसमध्ये कार्यरत असताना अजमल कसाबचा मोबाईल चौकशीसाठी घेतला होता. या प्रकरणाची चौकशी मुंबई क्राइम ब्रांचकडे देण्यात आली होती. त्यानंतर परमबीर सिंह यांनी तो मोबाईल क्राइम ब्रांचकडे दिला नव्हता, असा दावा पठाण यांनी तक्रारीत केला आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा याच मोबाइलवरुन कसाबसह इतर दहशतवादी पाकिस्तानमधील हँडलरशी संवाद साधत होता. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी पठाण यांनी केली आहे.