नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. या आशयाचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लिहिलं होतं. परमबीर यांनी पत्रात लिहिलेल्या आरोपांची सखोल चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकून राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात सुद्धा धाव घेतली. परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आजच सुनावणी होणार आहे. एकूण १३० पानांची याचिका परमबीर सिंह यांनी दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. कपिल सिब्बल राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडतील, तर मुकुल रोहतगी परमबीर सिंह यांच्यावतीने बाजू मांडणार आहेत. मुंबईत स्फोटकांनी गाडी सापडल्या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली होती. त्यामुळे दुखावलेल्या परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत पत्र लिहिले होते. त्यांच्या पत्राची दखल घेत नसल्याचे लक्षात आल्यावर परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर २६ मार्च रोजी सुनावणी होणार होती. पण, याचिकेवर लवकर सुनावणी घ्यावी अशी विनंती करण्यात आली. त्यामुळे आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती संजीव रेड्डी आणि न्यायमूर्ती कौल या द्विसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस दलातील अधिकाऱ्याला १०० कोटी रुपये वसूल करण्यासाठी सांगितले होते. हे एक मोठं षड्यंत्र आहे, पोलीस विभागाला खंडणी मागायला लावणं याला तर माफीच असू शकत नाही. सुप्रीम कोर्ट पुराव्याच्या आधारे निर्णय करेल’, असं म्हणत परमबीर सिंह यांनी ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे.
२० मार्च रोजी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत खळबळ उडवून दिली होती. या पत्रातून परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे याला दर महिन्याला मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा गौप्यस्फोट परमवीर सिंह यांनी केला आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला आपल्या निवास्थानी बोलावून वसुली करण्याचे सांगितले होते, असंही परमबीर यांनी पत्रात उल्लेख केला आहे.
















