पारोळा (प्रतिनिधी) एका २१ वर्षीय मतीमंद तरुणी अत्याचारातून तीन महिन्यांची गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिडीत तरुणीच्या आईच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Crime News)
पिडीता एका भागात आपल्या परिवारासह राहते. पिडीतेची आई शेत मजुरी करुन परिवाराचा उदरनिर्वाह करते. आई शेतात गेल्यानंतर मतिमंद तरुणी ही घरी एकटीच रहायची. दि. १२ जानेवारी रोजी पिडीतेने अचानक आपल्या पोटात दुखत असल्याचे आईला सांगितले. यानंतर आईने तिला शहरातील एका रुग्णालयात दाखवले असता त्यांनी धुळे येथील मेडीकल कॉलेज दाखवण्याचा सल्ला दिला.
धुळे येथे पिडीतेची तपासणी केली असता डॉक्टरांनी पिडीता तीन महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती दिली. पिडीता मतिमंद आणि घरी एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर लैंगीक अत्याचार झाल्याचे यातून स्पष्ट झाले होते. यानंतर पिडीतेच्या आईने पोलीस स्थानक गाठत अज्ञात व्यक्तीविरुध्द फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो उप निरीक्षक गंभीर शिंदे हे करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे समाजमन मात्र, सुन्न झाले आहे.