नागपूर (वृत्तसंस्था) काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीला उतरण्याची तयारी दर्शवली आहे. पक्षाने आदेश द्यावा, मी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लढायला तयार आहे, असं वक्तव्य बाळू धानोरकर यांनी केलं आहे. तीन वर्षाच्या कालखंडात पक्षानं आदेश द्यावा की धानोरकर जा तुम्ही वाराणसीत. जर मी गेलो नाही, लढलो नाही आणि जर नाही मोदींचा ट्रम्प केला तर नावाचा बाळू धानोरकर सांगणार नाही, असं ते म्हणाले.
पक्षाने आदेश दिला तर पंतप्रधान मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा काँग्रेस खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी दिला आहे. दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. देशातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आज काँग्रेसनं नागपुरात राजभवनावर आंदोलन केलं. त्यावेळी खासदार धानोरकर बोलत होते. यावेळी धानोरकर म्हणाले की, भाजपा ही आमची पैदाईश आहे. १९०७ मध्ये यांनी प्रवेश केला आणि १९२५ मध्ये जन्म घेतला. ज्या पद्धतीने अमेरिकेतून ट्रम्प हद्दपार झाला, त्यापद्धतीने मोदींना भारतातून हाकलल्याशिवाय राहणार नाही. बाळू धानोरकर महाराष्ट्रातला एकमेव खासदार नाही. पक्षाने फक्त आदेश द्यावा, वाराणसीत जाऊन लढायची ताकत माझ्यामध्ये आहे. आता तीन वर्ष बाकी आहेत. या तीन वर्षाच्या कालखंडात पक्षानं आदेश द्यावा की धानोरकर जा तुम्ही वाराणसीत. जर मी गेलो नाही, लढलो नाही आणि जर नाही मोदींचा ट्रम्प केला तर नावाचा बाळू धानोरकर सांगणार नाही, असं ते म्हणाले.
बाळू उर्फ सुरेश धानोरकर हे मूळचे काँग्रेसी नेते नाहीत. लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळावं म्हणून बाळू धानोरकर यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. चंद्रपूरच्या जागेवर काँग्रेसने उमेदवार घोषित केला होता. मात्र, बाळू धानोरकरांसाठी काँग्रेसने उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसला राज्यात केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला, ती म्हणजे चंद्रपूरची जागा.
विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीवेळी चंद्रपुरातून विनायक बांगडे यांना हंसराज अहिर यांच्याविरोधात काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. बांगडे यांच्या उमेदवारीमुळे चंद्रपूरमधील अनेक कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यात एका नाराज कार्यकर्त्याने याबाबत फोन करुन तत्कालीन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना विचारणा केली होती. त्यावर माझं पक्षात कुणी एकत नाही असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं. मात्र ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत हायकमांडने चंद्रपुरातून धानोरकरांना उमेदवारी दिली होती. या संधीचं सोनं करत धानोरकरांनी महाराष्ट्रात एकमेव काँग्रेस खासदार होण्याचा मान मिळवला.
बाळू धानोरकर यांना काँग्रेसचं तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या आमदारकीचाही राजीनामा दिला. ते चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. केंद्रीय मंत्री असलेल्या हंसराज अहिर आणि शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकर यांच्यात ‘काँटे की टक्कर’ झाली. मात्र अखेर बाळू धानोरकर यांचा ४५ हजारांच्या मताधिक्याने विजय झाला. तीन वेळा खासदार आणि केंद्रीय मंत्रिपद भूषवलेल्या भाजप नेत्याला एका आमदाराने पराभवाची धूळ चारल्याने धानोरकर जायंट किलर ठरले होते. त्यामुळे बाळू धानोरकरांना थेट पंतप्रधानांना आव्हान देण्याचा विश्वास वाटत आहे.