जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात शरद पवार यांची मी आज भेट घेणार असल्याची बातमी ही फक्त टीआरपीसाठी केलेली बातमी आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते एकनाथराव खडसे यांनी ‘द क्लियर न्यूज’ बोलताना दिली आहे.
माजी मंत्री तथा भाजपचे नेते एकनाथराव खडसे हे मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्यामुळे ते लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून रंगलेली आहे. अगदी मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत देखील या विषयावर चांगलीच चर्चा झाली होती. परंतु त्यावेळी खडसेंच्या प्रवेशाबाबत निर्णय होऊ शकला नव्हता. तशातच एकनाथराव खडसे हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा खडसे हे राष्ट्रवादीत जाणार असून आज शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे वृत्त सगळीकडे पसरले.
परंतु याबाबत एकनाथराव खडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मी मुंबईत माझ्या एका वेगळ्या कामानिमित्त आलेला आहे. तसं काही असेल तर निश्चितच तुम्हाला सांगेल. पण मी पवार साहेबांची भेट घेणार हे वृत्त म्हणजे फक्त टीआरपी वाढवण्यासाठी देण्यात आले आहे. तूर्त तसा काही विषय नाही. असल्यास तुम्हाला निश्चितच कळवेल,अशा शब्दात खडसे यांनी आपली प्रतिक्रिया ‘द क्लिअर न्यूज’ला दिली. दरम्यान, आज खडसे पवारांची भेट घेतात का? भेट घेतली तर दोघांमध्ये पक्षप्रवेश याबाबत चर्चा होईल का? याकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.