जळगाव (प्रतिनिधी) इकरा एज्युकेशन सोसायटी जळगावमध्ये बी.एम. जैन प्रायमरी उर्दू शाळामध्ये कार्यरत असणारे शिक्षक मोहम्मद सादिक अब्दुल गफार व आसिफ खान सादिक खान या दोन्ही शिक्षकांना शंभर टक्के पगार फरक सहित त्वरित अदा करण्याचे दोन वेग वेगळे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. या आदेशात इकरा एज्युकेशन सोसायटीला सुमारे ७५ लाख रुपये भरण्याचे आदेश झाले असून इकरा शिक्षण संस्थासोबत इतर शैक्षणिक संस्थांना मोठा हादरा मानला जात आहे. याबाबतची माहिती मनीयार बिरादरीचे जळगाव जिल्हाध्यक्ष फारुख शेख यांनी दिली आहे.
काय आहे ही दोन्ही प्रकरणं ?
फारुख शेख यांनी दिलेल्या डिजिटल प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, १) मोहम्मद सादिक अब्दुल गफ्फार हे इकरा मध्ये २-६-२००३ पासून मान्यता प्राप्त शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांना २०२० म्हणजे १७ वर्षापर्यंत ३०० ते ३००० हजार रुपये पगार देण्यात येत होता त्यामुळे त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका क्रमांक ४८६/२०२१ दाखल केली असता न्यायमूर्ती मंगेश पाटील व संदीप मारणे यांनी २९-९-२२ रोजी आदेश पारित केले की मोहम्मद सादिक या शिक्षकाला १०-१२-२०१७ पासून पूर्ण शंभर टक्के पगार फरक सह अदा करण्यात यावे अशा प्रकारे सादिक यांना अंदाजे ३५ लाख रुपये देण्याचे आदेश झालेले होते.
परंतु शिक्षण संस्था चालक यांनी शिक्षकाला पैसे न दिल्याने सदर शिक्षकाने पुनश्च उच्च न्यायालयात अवमान याचिका क्रमांक २२१/२०२३ दाखल केली असता त्यावर ईकरा संस्थेने तातडीने पाच लाख रुपये प्राथमिक स्वरूपात न्यायालयात भरले व बाकी पैसे भरण्यासाठी टाळा टाळ करीत आहे. मोहम्मद सादिक यांच्यातर्फे अॅड. ए.एन.अन्सारी यांनी काम पाहिले.
२) आसिफ खान सादिक खान शिक्षक ९-६-२००५ पासून मान्यता प्राप्त शिक्षक म्हणून कार्यरत आहे. २०२१ पर्यंत सुद्धा त्यांना ३०० ते ३ हजार रू पगार मिळत असल्याने त्यांनी सुद्धा उच्च न्यायालयाचे दार ठोठावले याचिका क्रमांक ११४८६/२०२१ अनुसार दाद मागितली असता न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी व न्यायमूर्ती चपळगावकर यांनी ३० जानेवारी २०२४ रोजी आदेश पारित केले असून आसिफ खान या शिक्षकाला नियमानुसार ३-१०-२०१८ पासून पूर्णपणे शंभर टक्के पगार फरक सह चार महिन्याच्या आत देण्यात यावे. अशा प्रकारे या शिक्षकाला अंदाजे ३५ ते ४० लाख रुपये मिळणार आहे. आसिफ यांच्यातर्फे अॅड. जितेंद्र पाटील यांनी काम पाहिले.
शिक्षक का गेले उच्च न्यायालयात?
शिक्षकांना सुमारे पंधरा ते सतरा वर्ष होऊन सुद्धा १०० टक्के अनुदानित शाळेत बदली न करता त्याऐवजी इतर मॅनेजमेंटच्या नातेवाईकांना अथवा इतर प्रलोभना खाली दुसऱ्या शिक्षकांना डायरेक्ट १०० टक्के अनुदानित वर्गावर घेतले जात असल्याने या अन्यायाविरुद्ध शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने त्यांना न्याय दिलेला आहे.
दोन्ही शिक्षकांचे दोन्ही विद्यार्थि १०० टक्के पगारावर याच संस्थेत शिक्षक !
आसिफ खान व मोहम्मद सादिक यांनी ज्या विद्यार्थिनीस व विद्यार्थ्याला शिकविले ते दोन्ही विद्यार्थि त्याच शाळेत शंभर टक्के अनुदान पगारावर रुजू झाले आहेत. त्यात एक शिक्षिका ही ईकरा शिक्षण संस्थेचे शालेय समिती अध्यक्ष यांची मुलगी व दुसरे मुख्याध्यापकांचे नातेवाईक असल्याने त्यांना डायरेक्ट १०० टक्के अनुदानित जागावर घेतले गेले आहे. आसिफ खान यांच्याकडून शिक्षण घेतलेली विद्यार्थिनी १०० टक्के अनुदानितवर लागते व वीस वर्ष झाले तरी आसिफ खान ४० टक्केवर काम करतो हा कसला न्याय आहे ?
शिक्षकांनी अन्यायाविरुद्ध लढावे !
जळगाव जिल्ह्यातील ज्या शिक्षकांसोबत अशा प्रकारचा अन्याय होत आहे त्यांनी आपल्या शिक्षण संस्थे विरुद्ध न्याय मागावा त्यासाठी उचित कायदेशीर मार्गदर्शन व वकील लाऊन देण्याची जबाबदारी फारुक शेख यांनी स्वीकारली असून त्यांच्याशी शिक्षकांनी संपर्क साधावा, असे आवाहन सुद्धा त्यांनी एका पत्रकाद्वारे केलेले आहे.