मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोना परिस्थितीबाबत ईशान्यकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी पर्यटन क्षेत्रात वाढती गर्दी आणि ईशान्येकडील राज्यांमधील कोरोना संसर्ग वाढण्याचे प्रमाण याविषयी पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. “लोक मास्क परिधान न करताच पर्यटनस्थळी, बाजारात जात आहेत हे खरंच चिंताजनक आहे”, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वीच उत्तर भारतातल्या काही प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी दिसून आली. यावेळी पर्यटकांनी कोणत्याही कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन केलं नाही. याचे अनेक व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहेत. यावरुनच पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तरेकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोना परिस्थितीसंदर्भात बोलत होते.
त्यांनी काही राज्यांमधल्या कोरोना परिस्थितीबद्दल काळजीही व्यक्त केली आहे. काही जिल्ह्यांची परिस्थिती फारच चिंताजनक असल्याचंही ते म्हटले आहेत. पंतप्रधानांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना अधिक चौकस राहण्याची सूचना केली असून कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी अधिकाधिक उपाय करण्याचं आवाहनही केलं आहे. ते म्हणाले, “कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. आपल्याला काही कठोर पावलं उचलावी लागतील. सूक्ष्म पातळीवर जाऊन काम करावं लागेल. आपल्याला कोरोनाच्या नवनव्या व्हेरिएंट्सकडे लक्ष ठेवायला हवं. शास्त्रज्ञ सध्या त्यांचा अभ्यास करत आहेत. आपल्याला जनतेला कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं”. “लोक मास्क परिधान न करताच पर्यटनस्थळी, बाजारात जात आहेत हे खरंच चिंताजनक आहे”, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्र्यांशी बोलताना पंतप्रधान म्हणाले, “आपल्याला कोरोनाची तिसरी लाट रोखायची असेल तर लसीकरणावर जास्तीत जास्त भर द्यायला हवा. लसीकरणाचा वेग वाढवायला हवा”. उत्तरेकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या या बैठकीत आसाम, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोरम या राज्यांचे मुख्यमंत्री तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय हे देखील उपस्थित होते.
पर्यटकांची जागोजागी गर्दी
दुसरी लाट ओसरत असतानाच पावसाळा सुरु झाल्यामुळे अनेक पर्यटक सध्या वेगवेगळ्या पर्यटनस्थळी दाखल होत आहेत. विशेषतः ईशान्येकडील राज्यांना पर्यटकांची पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. याचबरोबर हिमाचल प्रदेशातील कुलु, मनालीमध्ये पर्यटकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे.