चाळीसगाव (प्रतिनिधी) ग्रामपंचायत निवडणूक ही ग्रामीण भागातील महत्वाची निवडणूक मानली जाते, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर प्रथमच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत चाळीसगाव तालुक्यातील सर्वच्या सर्व १२ जागांवर भारतीय जनता पक्षाच्या पुरस्कृत पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर परिवारातील सदस्य म्हणून गेली ४ वर्ष जनतेच्या अडीअडचणी व सुखदुःखात सोबत राहिलो आहे तसेच गावागावात विकासकामे देताना कधीही भेदभाव न केल्याची ही पावती आहे अस मी मानतो, अशी प्रतिक्रिया आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिली आहे.
आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आपल्या सोशल मीडियातील पोस्ट म्हटले आहे की, यासोबतच राज्यात दीड वर्षांपूर्वी आलेल्या भाजपा महायुती सरकार व ग्रामविकास मंत्री गिरिषभाऊ महाजन यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा योजनेची शेकडो कोटींची विकासकामे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची १०० किमी हुन अधिक लांबीचे रस्ते यांची कामे प्रत्यक्षात सुरू झाल्याने जनतेचा भाजपा प्रति विश्वास अधिक वृद्धिंगत झाला. त्यामुळे भाजपा विचारांचा सरपंच असला व ग्रामपंचायत वर भाजपचे बहुमत असले तर अधिक जोमाने गावाचा विकास होऊ शकतो हा ठाम विश्वास ग्रामीण भागात निर्माण झाल्याने त्यांनी सर्व ठिकाणी भाजपला पसंती दिली आहे.
मी सर्व मतदारांचे आभार मानतो, विजयी सरपंच व सदस्यांचे मनापासून अभिनंदन करतो तसेच ज्यांचा पराभव झाला त्यांनी खचून न जाता गावाच्या विकासासाठी जागल्याची भूमिका घेत चांगल्या कामांना साथ द्यावी व जोमाने कामाला लागावे,
गावाच्या विकासासाठी शुभेच्छाही आमदार मंगेश चव्हाण यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची विजयी घोडदौड सुरु आहे. ११ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले असून बिनविरोध झालेली १ ग्रामपंचायतसह १२ पैकी १२ ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटासह शिवसेना उबाठा गट व काँग्रेस पक्षाला आपले खातेही उघडता आले नाही.