मुंबई (वृत्तसंस्था) ‘राष्ट्रीय हरित लवादाने प्रदूषणाच्या प्रश्नावरून ज्या १२२ शहरांत फटाक्यांची विक्री व वापरांवर पूर्णपणे बंदी घातलेली आहे, त्यात मुंबईचाही समावेश आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणात व ३० नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांवर पूर्ण बंदी घालतानाच १४ नोव्हेंबर रोजी हौसिंग सोसायट्यांमध्ये फुलबाजा, अनार यासारखे फटाके फोडण्यास मुंबई महापालिकेने दिलेली मुभा ही लवादाच्या आदेशाचे उल्लंघन करणारी आहे’.
‘फटाक्यांच्या प्रदूषणामुळे करोनाचे संकट अधिक तीव्र होऊन सार्वजनिक स्वरुपात त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, हे लक्षात घेऊनच लवादाने ९ नोव्हेंबरच्या आदेशाने देशभरातील १२२ शहरांत फटाक्यांच्या विक्री व वापरावर पूर्णपणे बंदी घतली आहे. लवादाच्या या आदेशाचे खऱ्या अर्थाने पालन होणे गरजेचे आहे. केवळ १४ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनच्या दिवशी हौसिंग सोसायट्यांमध्ये सौम्य स्वरूपाचे फटाके वाजवण्यास महापालिकेने दिलेली मुभा या आदेशाचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे पालिकेने आपल्या परिपत्रकात दुरुस्ती करून मुंबईत फटाक्यांवर पूर्ण बंदी लागू करणारे सुधारित परिपत्रक जारी करावे’, अशी विनंती बिरवडकर यांनी आयुक्तांना केली आहे.
















