जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा दूध संघात रोजंदारी कर्मचाऱ्यांसह विविध साहित्य, सेवा पुरवठा करणारे बहुतांश कंत्राटदार हे संचालकांचे निकटवर्तीय आहेत. काही संचालकांनी स्वतःच्या घरातील व्यक्तीच्या नावे कंत्राटे घेतली आहेत. या लोकांनीच दूध संघ आर्थिकदृष्ट्या ओरबडल्याची तक्रार संघाचे माजी सुरक्षा अधिकारी एन.जे. पाटील यांनी केली आहे.
या कंत्राटदारांसह त्यांच्यावर कारवाई न करणारे संचालक, अधिकारी, ऑडिटर यांच्यासह ४१ जणांवर गुन्हा दाखल करावा यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर २९ नोव्हेंबर रोजी सुनावणी होईल. सध्या अटक केलेले सर्व आरोपी आणि विठ्ठल-रुख्मिणी या एजन्सीचाही या तक्रारीमध्ये समावेश आहे. दूध संघामध्ये उत्पादनात फारसी वाढ झालेली नसताना कर्मचारी संख्या मात्र ५०० वरून ९०० झाली आहे. त्यात अनेक कामगार हे खासगी सेवेत असून, संघातून पगार घेतात. काही जणांची नावे केवळ पगाराच्या यादीत असून, ते कधीही दूध संघात आलेच नाहीत. यात कोणते कंत्राटदार कोणाचे नातेवाईक आहेत, याची माहितीही देण्यात आलेली आहे. कंत्राटांमध्ये घोळ : ५ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीचे काम असल्याने कोणत्याही टेंडरशिवाय केवळ तोंडीच निरोप देऊन लेखी निविदा मागवली जाते. यात ठरावीक कंत्राटदारांनाच कामे दिली जातात. २० लाखांचे काम असल्यास त्याची निविदा काढू नये म्हणून ५ लाखांपेक्षा कमी किमतीचे तुकडे केले जातात. कंत्राटदारांना निविदा देण्याची पारदर्शी पद्धत वापरली जात नाही. विठ्ठल-रुख्मिणी या एजन्सीला विक्री केलेले तूपदेखील याच प्रकारातील होते.
दूध संघातील बी ग्रेड तूप विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हे संघातील केवळ एकच प्रकरण असून, मी यासह अनेक प्रकरणातील भ्रष्टाचार बाहेर काढला आहे. सर्वांवर गुन्हा दाखल करावा यासाठी न्यायालयात गेलो आहे.
– एन. जे. पाटील (तक्रारदार)