मुंबई (वृत्तसंस्था) देशात एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलेला असताना, दुसरीकडे सामान्यांच्या खिशाला इंधन दरवाढीमुळे मोठी झळ बसत आहे. सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तर आज मुंबईत पेट्रोलमध्ये ३७ पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेल ३९ पैशांनी वधारले आहे. मुंबईत आज पेट्रोल ९६.९४ रुपये आहे तर डिझेल ८८.०१ रुपये आहे.
खरंतर, तेल कंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करतात. त्यानुसार आज सलग १२ व्या दिवशी ही वाढ झाली आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये तर पेट्रोलची किंमत प्रतिलिटर १०० रुपयांच्या पुढे गेली आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत ३९ पैसे वाढीसह ९०.५८ वर पोहचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. बेंचमार्क क्रूड ऑईल ६३ डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेलं आहे. आंतरराष्ट्रीय फ्युचर्स मार्केट इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंज (आयसीई) मधील बेंचमार्क क्रूड ऑईल मंगळवारीच्या सत्रात ०.५१ टक्क्यांनी वधारून ६३.६२ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं होतं. न्यूयॉर्क मर्केंटाइल एक्सचेंजवर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटच्या (डब्ल्यूटीआय) मार्च कॉन्ट्रॅक्टमध्ये सत्रातील १.३१ टक्क्यांनी वाढून ६०.२५ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं होतं.
देशातील प्रमुख शहरातील दर
मुंबई – पेट्रोल ९६.९४ रुपये, डिझेल ८८.०१ रुपये
दिल्ली – पेट्रोल ९०.५८ रुपये, डिझेल ८०.९७ रुपये
चेन्नई – पेट्रोल ९२.५९ रुपये, डिझेल ८५.९८रुपये
कोलकाता – पेट्रोल ९५.३३ रुपये, डिझेल ८४.५६ रुपये
दररोज ६ वाजता किमती बदलतात
दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी ६ वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.
















