नांदेड ता. धरणगाव (दीपक भोई) परिसरात काही दिवसापासून हिंस्त्र प्राण्याकडून शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला करून ठार मारण्याचा सपाटा सुरु आहे. मागील काही दिवसात ‘त्या’ हिंस्त्र प्राण्याने पाच ते सहा जनावरांचा बळी घेतलाय. तर हिंस्त्र प्राण्याकडून जोपर्यंत माणसांवर हल्ला करत नाही. तोपर्यंत पिंजरा लावून त्याला पकडून नेता येणार नाही, असे अजब उत्तर वनविभागाकडून गावकऱ्यांना देण्यात आले आहे. दरम्यान, आपण स्वत: हिंस्त्र प्राण्याला बघीतल्याचा दावा एका प्रत्यक्षदर्शीने केला आहे.
नांदेड परिसरात काही दिवसापासून हिंस्त्र प्राण्याकडून शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांच्या जीव घेत आहे.मागील पाच-सहा दिवसांत त्याने आतापर्यंत पाच ते सहा जनावरांचा बळी घेतला आहे. याबाबत ऑनलाईन तक्रार करण्यात आली आहे. एवढेच काय तर वनअधिकाऱ्याकडे वैयक्तिक मोबाईल नंबरवर संपर्क साधून याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. गावात वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी येऊन फक्त मृत जनावरांचा पंचनामे वगैरे करून निघून जातात.
माणसांवर हल्ला करत नाही तोपर्यंत पिंजरा लावता येणार नाही
शेतकऱ्यांसह गावातील नागरिकांचे असे म्हणणे आहे की, हा हिंस्त्र प्राणी रात्रीलाच पाळीव जनावरांवर हल्ला करत आहे. वन विभागाने याबाबतीत रात्री आणि दिवसागस्त घालावी. तसेच गावातील माणसांवर हल्ला करण्यापूर्वी या प्राण्याचा काहीतरी बंदोबस्त करावा. यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, हिंस्त्र प्राणी जोपर्यंत माणसांवर हल्ला करत नाही. तोपर्यंत पिंजरा लावून त्याला पकडून नेता येणार नाही. दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अजब उत्तर ऐकून लोकांमह्ये जास्त भीती पसरली आहे. तर शेतात शेतमजूर यायला तयार नाहीय. ती हिंस्त्र प्राणी कधी कोणत्या माणसावर हल्ला करेल?, याची भीती लोकांच्या मनात घर करून आहे.
हिंस्त्र प्राण्याला बघितल्याचा प्रत्यक्षदर्शीचा दावा
नांदेड येथील रहिवाशी विजय नारायण सैदाणे यांनी आपण स्वत: बिबट्याला पहिल्याचा दावा केला आहे. शुक्रवारी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास घुरखेडा शिवारातून म्हशींच्या दुधाच्या कॅन डोक्यावर घेऊन नांदेड गावात परत येत असतांना आपल्याला हिंस्त्र प्राणी दिसला. थोडं वाघासारखे तोंड होते. तसेच उंची कमरे एवढी होती. तर त्यांचा रंग भुरा होता. परंतू मला बघून त्याने लागलीच काटेरी झुडपातून पळ काढला. श्री. सैंदाणे यांनी वर्णन केलेला प्राणी हा तडस किंवा मोठा कोल्हा असू शकतो, असा अंदाज वन्य प्रेमींनी वर्तविला आहे. दरम्यान, वन विभागाने तात्काळ काही पावलं उचलली पाहिजे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती श्री. सैदाणे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, भरत सैंदाणे यांनी शुक्रवारी दोन वेळेस वन विभागाकडे ऑनलाईन तक्रार नोंदवली. परंतू त्याचा काहीही उपयोग झाला नाही.