मुंबई (वृत्तसंस्था) देशातील सत्ताधारी पक्ष आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरात दंगल घडवण्याच्या विचारात असल्याचा, असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आम्हाला भीती वाटते. जसं गोधरा हत्याकांड केलं. त्याप्रमाणे राम मंदिराच्या उद्घाटनाला देशभरातून ट्रेन बोलवतील आणि त्या एखाद्या ट्रेनवर हल्ला करतील. त्याच्या आगीचा डोंब उसळणार तर नाही ना अशी भीती वाटतेय, असेही राऊत म्हणाले.
राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून ट्रेनने लोकांना बोलावलं जाईल. यातील एखाद-दुसऱ्या ट्रेनवर दगडफेक केली जाईल. पुलवामाप्रमाणे धर्मांधतेचा आगडोंब उसळवणार नाही ना अशी भीती वाटतेय. जर पुलवामा घडवला जाऊ शकतो, गोध्रा घडवलं गेलंय असं म्हटलं जातंय. त्यामुळे, अशा प्रकारची घटना २०२४ च्या निवडणुकीसाठी केली जाईल, अशी भीती देशातील अनेक प्रमुख पक्षांना वाटतेय. इंडियाच्या बैठकीत यावर चर्चा होईल. पण आम्ही अत्यंत सावध आहोत, असं संजय राऊत म्हणाले.
भाजपकडे 2024 च्या निवडणुकीसाठी कुठलाही अजेंडा नाही. या देशात बेरोजगारी महागाई आहे. चीनने घुसखोरी केलेली आहे. अनेक प्रश्न आहेत. पण त्याच्याकडे लक्ष न देता धार्मिक तणाव निर्माण करायचा आणि मग निवडणुकीला सामोरे जायचं. हा एकच अजेंडा भाजपकडे आहे, असं संजय राऊत म्हणालेत. या लोकांनी गोध्रा घडवल्याचे सांगितले जाते. पुलवामा हल्ल्यावर संशय व्यक्त केला जातो. त्यानुसार 2024 ची निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून असे प्रकार केले जाऊ शकतात. या मुद्यावर इंडियाच्या बैठकीत चर्चा होईल. जनतेलाही अशी भीती वाटत आहे. त्यामुळे आम्ही अत्यंत सावध आहोत, असे राऊत म्हणाले.
















