नांदेड (वृत्तसंस्था) “देशात पहिल्या टप्याचे मतदान झाले आहे. त्यामुळे मतदान करणाऱ्या आणि पहिल्या वेळी मतदान करणाऱ्यांचे आभार मानतो. पहिल्या टप्प्यात एनडीएला एकातर्फी मतदान झालं आहे. मात्र कोणालाही मतदान करा पण मतदान जरूर करा. नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर आणि हिंगोलीचे शिंदे गटाचे उमेदवारी बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मराठवाड्यात आज दोन सभा होणार आहेत. नांदेड आणि परभणी येथे सभा होणार आहेत.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला. यासोबत पहिल्या टप्प्यात एनडीएला एकातर्फी मतदान झाल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला. सध्या उष्णता खूप आहे, लग्नसमारंभ आहेत, शेतकऱ्यांचे काम सुरू आहे. पण देशाच्या सीमेवर कोणत्याही परिस्थितीत जवान उभा असतो. मतदारांमध्येही ही जागृती असली पाहिजे. आपल्या देशाचे भविष्य सुनिश्चित करण्यासाठी मतदान करा. लोकतंत्रासाठी पुन्हा आग्रह करतो मोठ्या प्रमाणात मतदान करा,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
“ज्यांचा पराभव पक्का आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनाही सांगतो मतदान करण्यासाठी सर्वांना प्रेरित करा. जगात सर्वाधिक मतदान भारतात होतं. तसेच अधिक मतदान लोकशाहीचा परिचय देते. जे आघाडीवर विश्वास ठेवू शकत नाहीत त्यावर तुम्ही विश्वास ठेवणार का? या निवडणुकीत यांना धडा शिकवणे गरजेचे आहे,’ असेही पंतप्रधान म्हणाले.