जळगाव (प्रतिनिधी) तरूण पिढीतील कल्पकता, जिज्ञासा आणि नावीन्याचा शोध घेण्याची वृत्ती याचा सुंदर मिलाफ विद्यापीठ स्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेच्या निमित्ताने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बघायला मिळाला.
विद्यापीठात दि. १८ व १९ डिसेंबर रोजी विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी या स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेत ५६२ विद्यार्थ्यांनी ३६२ प्रवेशिकांमधून ३३१ पोस्टर्स व ३१ मॉडेल्सचे सादरीकरण केले. कृषी व पशुसंवर्धन, वाणिज्य व व्यवस्थापन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, मानवविज्ञान – भाषा- ललीत कला, फार्मसी आणि विज्ञान या सहा विषयात ही स्पर्धा होत असून पदवी गटात १४७ प्रवेशिका (२५९ विद्यार्थी), पदव्युत्तर गटात ११३ प्रवेशिका (१९६ विद्यार्थी), पदव्युत्तर पदवी गटात १०२ प्रवेशिका (१०७ विद्यार्थी) सहभागी झाले आहेत. विविध विषयांमधील पोस्टर व मोड्युल्सची मांडणी विद्यार्थ्यांनी सभागृहात केली होती.
या स्पर्धेतून निवडणूक प्रक्रिया डिजीटल पध्दत, महिला सक्षमीकरणाचा आढावा, हिंदीचा वाढता प्रभाव, स्त्री चित्रणाचा सामाजिक आणि वाडमयीन अभ्यास, कला तंत्रज्ञानाचा संगम, जनसंचार माध्यम आणि विज्ञान, लाडकी बहिण योजना प्रभाव व दुष्परीणाम, लाडकी बहिण योजनेचा अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, मराठी मायबोली भाषा, सेंद्रीय शेती काळाची गरज, सोशल मिडीया, सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट, सायबर सुरक्षा, तंत्रज्ञानाचा वापर, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, दिव्यांगांसाठी पायाद्वारे माऊस हाताळणी, अंध व्यक्तीसाठी जादूचा चष्मा, पायी चालण्यापासून विजनिर्मिती, स्मार्ट ड्रेनेज सुविधा, आवाजातून इलेक्ट्रीक ऑपरेशन आदी विषयांवर पोस्टर व मॉड्युल्सव्दारे संशोधनाचे निष्कर्ष विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन : सकाळी या स्पर्धेचे उद्घाटन आयसर, पुणे येथील प्रा. अरविंद नातु यांच्या हस्ते झाले. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. बुऱ्हानपुर येथील आनंद एज्युकेशनल टेक्नीकल अॅण्ड व्होकेशनल सोसायटीचे संस्थापक श्री. आनंद चौकसी हे प्रमुख अतिथी होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, व्य.प. परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, प्रा.पवित्रा पाटील, अधिष्ठाता प्रा.अनिल डोंगरे, वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील यांची उपस्थिती होती. मंचावर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, अविष्कारचे समन्वयक प्रा. एच.एल. तिडके, उपसमन्वयक डॉ. नवीन दंदी उपस्थित होते.
प्रा. नातु म्हणाले की, आजच्या तरूण संशोधकांकडून आंतरविद्याशाखीय संशोधन होणे गरजेचे असून यातून वेगवेगळ्या विषयावर नाविन्यपूर्ण आविष्कार समोर येतील. आजचे चित्र असे आहे की, विदेशात काम करून मुळ भारतीयांना नोबेल मिळाले असून आता भारतातच काम करून नोबेल मिळाले म्हणजे ते भारतासाठी आनंदाचे असेल. गणित आणि जीवशास्त्र या विषयात अधिक शिक्षणाची सर्वानाच खुप गरज आहे. जी कोवीड मुळे खुप उंचावली आहे. छोटछोट्या प्रकल्पातून मोठ-मोठे प्रकल्प उदयास येत असतात. तेव्हा कोणताही प्रकल्प असा समोर आणा की त्याची गरज सर्वांना आवश्यक असेल.
आनंद चोकसी म्हणाले की, विज्ञान खुप प्रेमळ आहे यात जादू टोणा नसून विज्ञानाची कला आहे, जीभ आणि डोके शांत ठेवले तर तो यशस्वी होतो. सामान्य माणूसच काही तरी वेगळे करतो तेव्हा आपल्या स्वप्नांना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करा आणि प्रयत्न असे करा की, जीवनात येणाऱ्या प्रत्येक पिढीला ते कामात येतील. आपणाकडे वेळ खुप आहे पण त्याचे नियोजन नाही तेव्हा नियोजनासोबत आपले लक्ष्य निश्चित करा. जो पर्यंत लक्ष्य निश्चित होणार नाही तो पर्यंत स्वप्न पूर्ण होणार नाहीत. प्रयत्न करण्याआधी यशस्वी लोकांकडे बघून काम करा, आपले इगो दूर ठेवून स्वत:वर विश्वास ठेवत चांगले जीवन जगा व नवीन आयडीया आणा असा मौलीक सल्ला त्यांनी यावेळी दिला.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी संशोधनात आविष्कार सारख्या स्पर्धेतून आपल्या ज्ञानाला संधी मिळतात यातून बऱ्याच वेगवेगळ्या कल्पना उदयास येतात, संशोधकात गुणवत्ता, मौलीकता आणि नाविन्यता असली की संशोधन अतिशय मजबूत होते. आवड, संयम व एकाग्रता याची सांगड नियमित ठेवा. आपल्या उज्वल भविष्यासाठी विद्यापीठ नेहमी तत्पन राहील असे ते म्हणाले. प्रारंभी प्रा. एच.एल. तिडके यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रिती सोनी, व प्रा.विजय घेरपडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. नवीन दंदी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी आभार मानले.
ही संशोधन स्पर्धा दि. २० डिसेंबरपर्यंत असून उद्या शुक्रवार दि. २० डिसेंबर रोजी दु. ३.३० वाजता प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण समारंभ होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आयसर, पुणे येथील प्रा. श्रीनिवास होथा व केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भरत अमळकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी व्य.प. सदस्य राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांची उपस्थिती असणार आहे.