मुक्ताईनगर (प्रतिनिधी) मुक्ताईनगर तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या तापी पुर्णा नद्यांच्या तिरावर मोठ्या प्रमाणात विद्युत पंप ( मोटारी) बसवुन त्याच्या सहाय्याने चांगदेव मानेगाव शिवारातील शेतकऱ्यांनी शेतात पाणी नेले असुन त्यावर त्यांनी शेती सिंचित केली आहे परंतु नदीकाठी बसवलेल्या विद्युत पंप आणि केबलची चोरी होत असल्याने शेतकरी बांधव मेटाकुटीला आले आहेत.
गेल्या दोन वर्षात नदीकिनारी बसवलेल्या कृषिपंपांना (मोटारी) लक्ष्य करून अनेक मोटारी व केबल चोरून नेत चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे अशा चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने मोटारींअभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने पिक पाण्याअभावी सुकुन जातात त्यामुळे हातातोंडाशी आलेले पिक वाया जाते. नविन विद्युत पंप (मोटार) बसवले तर ते पण सुरक्षित राहतील याची खात्री नाही त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका सहन करावा लागतोआहे त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे,
आज या शिवारातील शेतकरी बांधवांनी उद्दिग्न होऊन मुक्ताईनगर पोलिस स्टेशन गाठून विद्युत पंप चोरी करणाऱ्या चोरट्यां विरोधात तक्रारी दाखल केल्या. यावेळी पोलिस स्टेशनमध्ये शेतकरी बांधवांसोबत राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी पोलिस प्रशासनाने मोटार केबल चोरीच्या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन चोरट्यांना लवकरात लवकर पकडून शेतकरी बांधवांना दिलासा देण्याबाबत पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या सोबत चर्चा केली.
यावेळी बोलतांना रोहिणी खडसे म्हणाल्या की, चांगदेव मानेगाव शिवारातील शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी मोठया प्रमाणात खर्च करून शेती ते नदी पर्यंत पाईपलाईन करून नदी काठी विद्युत पंप बसवले आहेत परंतु गेले दोन वर्षात हे विद्युत पंप व केबलची वारंवार चोरी होत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठे आर्थिक नुकसान होते यापुर्वी तक्रार दाखल करून सुद्धा चोरट्यांचा शोध लागला नसून या घटना वारंवार होत आहेत आज पोलिस निरीक्षक मोहिते यांना भेटून त्यांच्याकडे शेतकरी बांधवांच्या व्यथा मांडल्या व लवकरात लवकर कठोर पाऊले उचलून या विद्युत पंप चोरट्यांचा शोध लावून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली. भविष्यात चोरीच्या घटना सुरूच राहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तर्फे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. यावेळी चांगदेव मानेगाव शिवारातील शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.