जळगाव (प्रतिनिधी) काही दिवसांपूर्वी एका महिलेच्या नावाने जळगाव जिल्हा विशेष शाखेच्या (डीएसबी) अधिकारी कर्मचाऱ्यांना अश्लील मॅसेज पाठविल्याप्रकरणी पोलीस मुख्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र लोटन पाटील (वारुळे) याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, ज्या पोलिसांना अश्लील मॅसेज गेले, त्यात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचाही क्रमांक होता. त्यामुळे या महिलेला मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. याच महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून सायबर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. धरणगाव, अमळनेर व नाशिक येथे दाखल गुन्ह्यांमध्ये देखील वारुळे यांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, पोलीस दलातील अंतर्गत वादातून वारुळे यांना या प्रकरणात गोवले जात असल्याचा युक्तिवाद त्यांचे वकील कुणाल पवार यांनी न्यायालयाला केला.
वारुळे हा स्थानिक गुन्हे शाखेच्या गोपनीय कामे करणाऱ्या इंटरसेप्शन विभागात कार्यरत आहे. गुन्हेगारांचे लोकेशन, सीडीआर काढण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. वारुळे यांच्याकडे घरझडतीत २९ मोबाईल, १४ सिम कार्ड सापडल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला. मात्र ज्या क्रमांकावरून अश्लील मॅसेज गेले ते सिम कार्ड मिळून आलेले नाही.