जळगाव (प्रतिनिधी) पोलीस स्थानकात दाखल असलेल्या ४२० च्या गुन्ह्यात अनुकूल आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यासाठी १९ हजार रुपयांची लाचची मागणी पोलीस नाईकने केली होती. परंतू तक्रारदाराकडून लाचेची मागणी करतांना त्याच्याकडील इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस पोलिसाने लांबवल्याची खळबळजनक घटना ६ मार्च रोजी अमळनेर शहरात घडली. संशयीत पोलिस नाईकाविरुद्ध अमळनेर पोलिसात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, बांभोरी बु. ॥, ता.धरणगाव येथील ४८ वर्षीय तक्रारदाराविरुद्ध धरणगाव पोलिसात ४२० अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचे अनुकूल चार्जशीट न्यायालयात पाठविण्याच्या मोबदल्यात धरणगाव पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक तथा संशयीत आरोपी विलास बुधा सोनवणे (रा.अमळनेर. ता.अमळनेर) यांनी १९ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. मात्र, तक्रारदाराने आपल्यावर ट्रॅप आणल्याचा संशय सोनवणे यांना येताच त्यांनी तक्रारदाराकडे एसीबीने दिलेले डिव्हाईस हिसकावून धूम ठोकली. या प्रकाराने अधिकारीदेखील अवाक् झाले. आरोपी सोनवणे यांच्याविरुद्ध अमळनेर शहर पोलिसात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक गोपाल ठाकुर, पोलिस निरीक्षक निलेश लोधी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर यांनी ही कारवाई केली. दरम्यान, आरोपी डिव्हाईस घेवून पसार झाला असून त्याचा सर्वत्र कसून शोध सुरू आहे.