चाळीसगाव (प्रतिनिधी) शहर पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील बसस्थानक परिसरात गुप्तपणे सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी कारवाई केली.
तालुक्यातील देवळी येथील मधुकर गोविंदा पाटील तसेच टाकळी प्र.चा. येथील दीपक बाळू घुमळकर (राणा) यांच्या जुगार अड्ड्यांवर ही धडक कारवाई करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षिका कविता नेरकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या आदेशानुसार करण्यात आली. स्थानिक गुन्हा शाखेचे पीएसआय शेखर डोमाळे व त्यांच्या पथकाने १२ नोव्हेंबरला छापे टाकून एकूण १७ हजार ९८० रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल भूपेश वंजारी आणि प्रशांत पाटील करत आहेत. कारवाईदरम्यान मधुकर पाटील याच्याकडून ८ हजार ३०० रुपये व जुगाराचे साहित्य, तर दीपक राणा याच्याकडून ९ हजार ४८० रुपये व जुगार साहित्य जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हा शाखा आणि चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन यांनी कारवाई केली
















