मुंबई (वृत्तसंस्था) राज्यभरात लवकरच पोलीस भरती सुरू होणार आहे. पोलीस दलातील रिक्त जागांसाठी 15 जूनपासून भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली आहे. इतकंच नाही तर, मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर भविष्यात 15 हजार जागांसाठीचीही भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचं वळसे-पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
मागील काही वर्षांपासून राज्यात पोलीस भरती प्रक्रिया रडखडलेली आहे. त्यामुळे पोलीस भरती नेमकी कधी होणार? असा प्रश्न भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना पडला होता. विशेषत: ग्रामीण भागातील तरूण पोलीस भरती प्रक्रियेची आतुरतेने वाट बघत होते. हीच बाब लक्षात घेता, राज्यात येत्या 15 जूनपासून विविध पदांसाठी सुमारे 7 हजार जागा भरण्यात येणार असल्याची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?
वळसे पाटील म्हणाले, “पोलिस दलातील रिक्त जागांची संख्या आणि मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन भविष्यात आणखी 15 हजार पदे भरण्यात येणार आहे. त्याबाबतची मागणी गृह विभागाकडून मंत्रिमंडळाकडे केली जाणार आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका सकारात्मक आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर 15 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यापुर्वी 15 जूनपासून राज्यातील पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु होईल. त्यामध्ये विविध पदांसाठी सात हजार जागा भरण्यात येणार आहेत. गृहविभागाने आतापर्यंत साडेपाच हजार जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे.”