एरंडोल (प्रतिनिधी) सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास गांधीपुरा भागात समाजकंटकांकडून तुफान दगडफेक करण्यात आली. यावेळी त्यांनी पोलिसांच्या वाहनांसह इतर वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करुन जमावाला पांगविण्याचा प्रयत्न करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गांधीपुरा भागातील शरद सुकदेव चौधरी या युवकाला सोमवार दि. २२ रोजी रात्रीच्या सुमारास दोन युवकांनी मारहाण केली. त्यामुळे दुसऱ्या गटातील शेकडोचा जमाव त्याठिकाणी जमा झाला. या घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, उपनिरीक्षक शरद बागल, अनिल पाटील, अकिल मुजावर, योगेश जाधव, मिलिंद कुमावत हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न करीत असतांनाच त्या जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली.
पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांनी घटनेची माहिती कंट्रोलला दिल्यानंतर धरणगाव, कासोदा, पारोळा यांच्यासह क्युआरटीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लाठीचार्ज करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. दगडफेकीच्या घटनेत सहाय्यक पोलीस गणेश अहिरे यांचेसह कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांचा अतिरीक्त बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रात्रभर धरपकड मोहीम राबविली. दगडफेक करणाऱ्या २९ संशयितांना पोलिसांनी अटक केली असून अन्य काही जण अद्याप फरार आहेत.
एका गटातील युवकांनी ज्ञानदीप चौकात देखील दगडफेक करून मोटरसायकली आणि चारचाकी वाहनांची तोडफोड केली. तसेच इतर भागांमध्ये देखील दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत हवालदार मिलिंद कुमावत यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीसस्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.