इंफाळ (वृत्तसंस्था) काँग्रेस नेते राहुल गांधी आजपासून दोन दिवसांच्या हिंसाचारग्रस्त मणिपूर दौऱ्यावर गेले आहेत. यादरम्यान राहुल गांधी हे जातीय हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना मदत शिबिरांमध्ये भेटून संवाद साधणार होते. परंतू राहुल गांधी यांचा ताफा पोलिसांनी विष्णूपूरला अडवला आहे. त्यामुळे राहुल गांधी हे इंफाळला परतले आहेत.
पोलिसांनी राहुल गांधी यांचा ताफा वाटेत अडवला. त्यामुळे संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी मात्र गोंधळ घालून बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला आहे. कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी अखेर पोलिसांना आश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. इम्फाळला पोहोचल्यानंतर राहुल गांधी चुराचंदपूरला रवाना झाले होते, मात्र पोलिसांनी त्यांचा ताफा विष्णुपूरजवळ अडवला.
यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसने याला दुर्दैवी म्हटले असून मोदी सरकार राहुल गांधींना रोखत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, मणिपूर येथे मे महिन्यात जातीय संघर्ष सुरू झाला आहे. हा जातीय संघर्ष सुरू झाल्यापासून आतापर्यंत 50 हजारापेक्षाही जास्त नागरिक बेघर झाले आहेत. हे नागरिक 300 मदत छावण्यांमध्ये राहत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी या नागरिकांना मदत छावण्यात जाऊन भेट देणार होते.