भंडारा (वृत्तसंस्था) पोलिस ठाण्यात आयोजित सामूहिक भोजन कार्यक्रमात भोजन करताना महिला पोलिस हवालदाराचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील गाव पोलिस ठाण्यात घडली. प्रज्ञा मोहनलाल चव्हाण (३५) रा. आंधळगाव असे मृतक महिला पोलिस हवालदाराचे नाव आहे. त्या २००८ मध्ये पोलिस दलात रुजू झाल्या होत्या.
आंधळगाव पोलिस ठाण्यात सर्व कर्मचाऱ्यांसाठी सामूहिक भोजनाचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. यात प्रज्ञा चव्हाण सहभागी झाल्या होत्या. रात्री सर्व सहकारी कर्मचाऱ्यांसह प्रज्ञा भोजन करत होत्या. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यामुळे उपस्थित सहकारी पोलिसांनी त्यांना तातडीने आंधळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले असता, वाटेत त्यांचा मृत्यू झाला.
प्रज्ञा चव्हाण यांना किडनीचा आजार होता. त्यांनी औषधांचे नियमित सेवन केले नाही. दरम्यान त्या १५ दिवस रजेवर होत्या. घटनेच्या दिवशीच त्या कर्तव्यावर रुजू झल्यात. त्यांना ९ वर्षाची मुलगी आणि ४ वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान, ३० एप्रिल रोजी आंधळगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांनी पोलिस ठाण्यात छोटेखानी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. रात्री १०:३० च्या सुमारास जेवण करत असताना प्रज्ञा चव्हाण यांना हृदयविकाराचा झटका आला. उपस्थित पोलिस कर्मचारी व ठाणेदार यांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, आंधळगाव येथे प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. पुढील उपचारासाठी भंडाऱ्याला नेत असतानाच वाटेतच त्यांच्यावर काळाने झडप घातली.