जळगाव (प्रतिनिधी) शहरातील देवकर महाविद्यालयाच्या समोर आज पहाटे शिर्डीहून दुचाकीने घरी परतणाऱ्यां पोलिसांच्या दुचाकीला झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. दुसरा पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सागर रमजान तडवी (वय-३० रा. हाबर्डी ता. यावल ह.मु. पोलीस लाईन, जिल्हा पेठ) हे रामानंदनगर पोलिस ठाण्यात आधी कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांची शिर्डी येथील देवस्थानाला नेमणूक झाली होती. दर आठवड्याला जळगाव येथे आईला भेटण्यासाठी येत होते. काल रात्री बारा वाजेच्या सुमारास सागर तडवी हे आपले सहकारी संतोष बोरसे यांच्यासह दुचाकीने जळगावला येत होते. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास जळगाव-शिरसोली रस्त्यावरील देवकर वैद्यकीय महाविद्यालयाच्याजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने सागर तडवी याचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला पोलिस कर्मचारी संतोष बोरसे हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या बोरसे पोलिस कर्मचार्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले तर मयत सागर तडवी याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.