मुंबई (वृत्तसंस्था) सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मुद्द्यावरुन शिवसेना धनंजय मुंडेंच्या बचावासाठी पुढे आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना विरोधकांना चिमटे काढले. खासगी आणि कौटुंबिक गोष्टी या त्याच पातळीवर सोडवायच्या असतात. त्यामध्ये राजकारण आणायचे नसते. विशेषत: राजकारण्यांनी या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे, असे विधान संजय राऊत यांनी केले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा संजय राऊत यांनी हे प्रकरण धनंजय मुंडे यांची कौटुंबिक आणि खासगी बाब असल्याचे सांगितले. त्यामुळे यावरुन कोणतेही राजकारण होता कामा नये, असे संजय राऊत यांनी सांगितले. धनंजय मुंडे प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसने काय भूमिका घ्यायची हे तेच ठरवतील. राष्ट्रवादीचे नेते सुजाण आणि प्रगल्भ आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे राष्ट्रवादीचे नेतेच ठरवतील, असे संजय राऊत यांनी भेटले. यावेळी संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची आठवण करुन दिली होती. तेव्हादेखील गोपीनाथ मुंडे यांच्यावर असेच आरोप झाले होते. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची पाठराखण केली होती, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. धनंजय मुंडेंवरच हा प्रश्न सोडला पाहिजे. कारण तो त्यांचा व्यक्तीगत, कौटुंबीक प्रश्न आहे. ते त्यातून मार्ग काढतील. राष्ट्रवादीचे नेते निर्णय घेण्यासाठी प्रगल्भ आहेत. काय निर्णय घ्यावा काय नाही याचा त्यांना जास्त अनुभव आहे, असे सुतोवाच शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केले आहे. पोलिसांनी बलात्काराची तक्रार दाखल करून घेतली नाही यावर मी काहीही बोलू शकत नाही. हा राजकीय विषय नाही. राजकीय विषयावर आरोप प्रत्यारोप ठीक आहेत. हा कौटुंबीक विषय आहे. एखाद्यावर वैयक्तीक टीका केल्यास त्याचे आयुष्य, कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. यामुळे राजकीय नेत्यांनी एकामेकांवर असले आरोप करू नयेत. राज्य सरकार अडचणीत येईल हा विरोधकांचा भ्रम आहे, असेही राऊत म्हणाले.
कोणत्याही व्यक्तीला राजकारणात शिखरावर पोहोचण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. त्यामुळे एका क्षणात चिखलफेक करुन त्यांचे जीवन उद्ध्वस्त करणे योग्य नव्हे. सर्व राजकारण्यांनी या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून आम्ही ही गोष्ट शिकलो आहोत, असे संजय राऊत यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या घडामोडीवरही भाष्य केले. केंद्राला वाटतंय की शेतकरी आडमुठे आहेत, शेतकऱ्यांना वाटतंय सरकार आडमुठेपणा करतंय, कायदे न्यायालयाने बनवलेले नाहीत, ते सरकारने तयार केले आहेत. सरकारने शेतकऱ्यांकडे एक पाऊल पुढे टाकावं, त्यामुळे सरकारवर आभाळ कोसळणार नाही, असेही खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
गुरुवारी पहाटेदेखील मुंबईच्या मलबार हिल येथील चित्रकूट बंगल्यावर येताना धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांना खबर लागणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली. पहाटे अडीच-तीनच्या सुमारास धनंजय मुंडे एका खासगी गाडीतून चित्रकूट बंगल्यावर आले. या गाडीच्या काचा काळ्या असल्यामुळे आत नेमके कोण बसले आहे, याचा अंदाज पटकन येणे शक्य नव्हते. यावेळी धनंजय मुंडे यांच्यासोबत नेहमीप्रमाणे पोलीस आणि सुरक्षारक्षकांचा ताफा नव्हता. ते एकटेच चित्रकूट बंगल्यावर आले होते.