मुंबई (वृत्तसंस्था) : शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मनसेची जवळीक वाढत चालली आहे. शिंदे गट किंवा भाजपसोबत आगामी निवडणुकीमध्ये युती होण्याची चर्चा रंगली आहे. तर खुद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘डबे जोडण्याच काम सुरू आहे’ असं सूचक विधान केलं आहे. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मनसे नेते आणि सरचिटणीस यांच्यासोबत ठाकरे यांची बैठक पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.आजची पक्षाची अंतर्गत बैठक आहे. त्यामुळे आज कुणी काही बोलणार नाही. आज अंतर्गत बैठक आहे, इतका मसाला काही आज मिळणार नाही पण डबे जोडण्याचं काम सुरू आहे, असं सूचक विधान राज ठाकरेंनी केलं. तसंच, मी विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहे. मी पहिल्यांदा नागपूरला जात नाहीये. यापूर्वी जेव्हा गेलो तेव्हा रेल्वेनेचं जातो. लांबचा प्रवास आहे त्यामुळे रेल्वे बरी पडते, त्यामुळेजेट लेग होत नाही, असा खुमासदार टोलाही राज ठाकरेंनी लगावला.
दरम्यान, राज ठाकरे विदर्भ दौरा 17 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. राज ठाकरे नागपुरसाठी विदर्भ एक्स्प्रेसने १७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता निघणार आहे. 20 सप्टेंबरला 1 दिवसीय चंद्रपुर दौरे करणार आहे. त्यानंतर 21 सप्टेंबरला राज ठाकरे अमरावतीला जाणार आहे. 21 आणि 22 सप्टेंबरला मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी मुंबईसाठी अमरावतीवरून अंबाई एक्स्प्रेसने मुंबईकडे प्रस्थान करणार आहे.