पुणे (वृत्तसंस्था) खडकी परिसरात महिला व मुलींचे फोटो मोबाईलमध्ये कैद करून त्याचे अश्लील पद्धतीने एडिटिंग करून ते व्हायरल केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आता खडकी पोलिसांनी एका २५ वर्षी विकृत तरुणाला अटक केली आहे. या घटनेची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खडकी पोलिसांकडून अहवाल मागवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील खडकी या भागात राहणारा एका २५ वर्षीय तरुण महिला तसेच मुलींच्या फोटोंसोबत छेडछाड करायचा. त्याने वस्तीत राहणाऱ्या महिलांचे फोटो काढले होते. नंतर हेच फोटो त्याने नग्न महिलांच्या फोटोवर लावले. विशेष म्हणजे हे फोटो त्याने सोशल मीडियावर व्हायरलदेखील केले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर या तरुणाविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केलं आहे. २०१९ पासून हा तरुण अशा प्रकारे महिलांचे फोटो व्हायरल करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
महिला आयोगाने मागवला अहवाल
वस्तीत राहणाऱ्या महिलांचो फोटो काढून ते अश्लिल स्वरुपात तयार केले आहेत. हा प्रकार गंभीर असून त्याची आपल्या स्तरावर चौकशी करावी. तसेच आपण केलेल्या कारवाईचा अहवाल महिला आयोग कार्यालयास तत्काळ पाठवावा, असे निर्देश महिला आयोगाने पुणे पोलिसांना दिले आहेत.