मुंबई (वृत्तसंस्था) पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री उशिरा या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. याप्रकरणी मुख्यमंत्री गंभीर असून ते राठोडांवर कारवाई करू शकतात, त्यामुळे आजचा दिवस राठोड यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं मानलं जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी पूजा आत्महत्याप्रकरणातील सर्व माहिती घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला? तपासात काय तथ्य आहे? राठोड यांचा कितपत सहभाग आहे? व्हायरल क्लिपमध्ये कितीपत सत्यता आहे? त्यातील आवाज राठोडांचाच आहे का? आधी बाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली असावी असं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर कोणत्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता बळावली असून राठोड राहणार की जाणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पूजा चव्हाण प्रकरणात नाव आल्यानंतर संजय राठोड हे नॉट रिचेबल आहेत. मात्र, ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याची शक्यता आहे. राज्याचे प्रमुख म्हणून आणि पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे राठोड आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे. राठोड यांनी बाजू मांडल्यानंतरच मुख्यमंत्री त्यांच्याबाबत कारवाईचा निर्णय घेतील, असं सूत्रांचं म्हणणं आहे. तसेच याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख आणि शिवसेनेच्या स्थानिक आमदारांशीही चर्चा करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
पूजा चव्हाण हिने आत्महत्या केल्याने तिच्या आत्महत्येबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पूजाच्या आत्महत्येमागे काही काळंबेरं आहे का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्यातच एका मंत्र्यांचं आणि त्याच्या कार्यकर्त्याचं कथित संभाषण व्हायरल झाल्याने त्यावर अधिकच तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. या क्लिप्समध्ये पूजाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता, तिची कसली तरी ट्रीटमेंट सुरू होती आणि या मंत्र्यांचं या संपूर्ण प्रकरणाशी कसलं तरी कनेक्शन होतं, असं स्पष्ट होत आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीची मागणी होत आहे.