जळगाव (प्रतिनिधी) अंडर-23 कर्नल सी. के. नायडू ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाची विजयी घोडदौड सुरू आहे. महाराष्ट्राचा पहिला सामना सौराष्ट्रविरुद्ध झाला. या सामन्यात महाराष्ट्राने दहा गडी राखून विजय मिळवला.
पहिल्या डावात जळगावच्या नीरज जोशी ने 36 धावांचे योगदान दिले होते. तर दुसऱ्या डावात 208 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने 149 चेंडूत नाबाद 134 धावा करत संघाला विजयी बंदरात पोहोचवले. फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही त्याने दुसऱ्या डावात दोन बळी घेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा सामना तामिळनाडूविरुद्ध खेळायचा होता, परंतु पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.
यानंतर इंदूर येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात महाराष्ट्राचा सामना मध्यप्रदेश संघाशी झाला. महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना 475 धावांचा डोंगर उभारला. पुन्हा एकदा नीरज जोशीने शानदार शतक ठोकत 111 धावा केल्या. त्याला अनिरुद्ध साबळेने 101, सचिन धसने 73, तर हर्ष मोघावीऱ्याने 71 धावांची खेळी केली.
मध्यप्रदेश संघाने प्रत्युत्तरात शुभम कुशावहा (118) आणि अखिल यादव (59) यांच्या खेळीच्या जोरावर 281 धावा केल्या. महाराष्ट्राने त्यांना फॉलो-ऑन दिला. दुसऱ्या डावात अखिल यादव (102) आणि माधव तिवारी (100) यांच्या शतकी खेळीमुळे मध्यप्रदेशने डावाने होणारा पराभव टाळला.
264 धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या महाराष्ट्राचा डाव केवळ 66 धावांत संपुष्टात आला आणि सामना अनिर्णित अवस्थेत संपला. या मालिकेत जळगावचा नीरज जोशी हा फलंदाज व अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रभावी ठरला आहे. महाराष्ट्र संघाचा पुढील सामना त्रिपुराविरुद्ध 23 ते 26 जानेवारीदरम्यान पुणे येथे खेळला जाणार आहे.
जळगावच्या या गुणी खेळाडूच्या चमकदार कामगिरीबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अपेक्स कौन्सिल सदस्य व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी विशेष अभिनंदन केले आहे. तसेच सचिव अरविंद देशपांडे, सहसचिव अविनाश लाठी आणि सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनीही नीरज जोशीचे मनःपूर्वक कौतुक केले आहे.
















