मुंबई (वृत्तसंस्था) वंचित बहुजन आघाडीने ठाकरे गटाबरोबर असलेली युती तोडली आहे. याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी जाहीरपणे सांगितले. आंबेडकरांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही युती एकतर्फी तोडली असल्याचं संजय राऊत म्हणाले. युती तोडताना त्यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करायला हवी होती, असंही राऊत म्हणाले.
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसतानाच प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता युती राहिली नाही, अशी घोषणा केली. आधी फक्त ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाली होती. ते आता राहिलेले नाही. मी अजूनपर्यंत बोललो नाही. पण, वंचितने महाविकास आघाडीत जायचे असेल, तर आधी आपण बसून चर्चा केली पाहिजे, असे अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला. धोरण ठरवले पाहिजे, जागा ठरवल्या पाहिजे. मग आपण तिकडे जायचे ठरवू. त्यातील काही गोष्टी पाळल्या गेल्या नाहीत, असेही आंबेडकर म्हणाले.
तर संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक आहेत. लोकसभेसंदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला, हा चार जागांचा प्रस्ताव कायम आहे, आम्हाला आजही वाटतं राज्याच्या नव्हे तर देशाच्या हितासाठी डॉ. आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं संविधानाचं, मजबूत लोकशाहीचं, ते संविधान आणि लोकशाही संकटात असताना प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेणं गरजेचे आहे. आम्हाला खात्री आहे की प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करतील,असेही राऊत म्हणाले.