नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींपैकी चार राज्यांमध्ये भाजपच्या दणदणीत विजयानंतर पहिल्यांदाच निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचे विधान समोर आले आहे. चार राज्यांत विजय मिळवल्यानंतर भाजप विरोधकांवर मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. किशोर यांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीतील सत्तेची खरी लढाई २०२४ मध्ये लढली जाईल.
प्रशांत किशोर यांनी ट्विट करुन म्हटलंय की, भारताची लढाई २०२४ सालीच लढली जाईल आणि ठरवली जाईल. कोणत्याही राज्यांच्या निवडणूक निकालावर हे भवितव्य ठरणार नाही. मात्र, साहेबांना हे माहिती आहे. म्हणूनच या राज्यांच्या निकालाभोवती विजयी उन्माद तयार करुन विरोधकांवर मानसिक विजय प्रस्थापित करण्याचा हा एक चतुर प्रयत्न आहे. मात्र, या चुकीच्या फसवणुकीला बळी पडून नका तसेच याचा भागही होऊ नका!
प्रशांत किशोर यांच्या सल्ल्याने लोकसभेसाठी तिसरी आघाडी बनवली जात असल्याच्या चर्चांना मध्यंतरी उधाण आलं होतं. तसेच भाजपविरोधात राष्ट्रीय पातळीवर एक मोठी आघाडी बनवण्यासाठी प्रशांत किशोर प्रयत्न करत असल्याच्याही बातम्या अधूनमधून येत असतात. मात्र, २०२४ च्या निवडणुकीपूर्वी असणाऱ्या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणूकाही तितक्याच महत्त्वाच्या आणि निर्णायक ठरतात. त्यामुळेच, या राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपविरोधात दंड थोपटून उभे असलेले पक्ष जीवाचे रान करताना दिसत असतात. मात्र, तरीही या निकालाचा अर्थ भाजपने २०२४ ची लोकसभा जिंकली असा लावू नका, असा संदेशच प्रशांत किशोर देत असल्याचं दिसून येतंय. ती निवडणूक स्वतंत्र असेल आणि तिचं भवितव्य या पाच राज्यांच्या निकालावर आधारीत ठरणार नाही, असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, पाच राज्यामधील विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळी भाजपाने दमदार कामगिरी केली आहे. या पाचपैकी चार राज्यांत भाजपाने सत्ता राखताना विजय मिळवला आहे. त्यातही भाजपाने सत्ताविरोधी लाट असताना उत्तर प्रदेशात ज्याप्रकारे विजय मिळवला त्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अनेक राजकीय जाणकारांच्या मते भाजपाने ज्या पद्धतीमे उत्तर प्रदेशमध्ये विज. मिळवला आहे. त्याचा फायदा भाजपाला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये होणार आहे.
गेल्या वर्षी झालेल्या बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला पराभूत करण्यामध्ये प्रशांत किशोर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यानंतर ममता बॅनर्जीच्या पक्षातील काही नेत्यांसोबत त्यांचे मतभेद झाल्याची चर्चा होती. मात्र आता ही नाराजी दूर झाली आहे. तसेच राजकीय सल्लागार म्हणून प्रशांत किशोर यांच्यासोबत करार सुरू ठेवण्याचा निर्णय तृणमूल काँग्रेसने घेतल्याचे वृत्त आहे.