जळगाव (प्रतिनिधी) एका कार्यालयात काम करणाऱ्या २८ वर्षीय तरुणीच्या कार्यालयात प्रवेश करीत चक्क तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधण्याचा प्रयत्न एका माथेफिरूने केला. इतकंच नव्हे तर त्याला रोखल्याने त्याने कार्यालयातील वस्तूंची देखील तोडफोड केली.
गोविंदा रिक्षा स्टॉप ते शाहूनगर रस्त्यावर असलेल्या एका मोबाईल कंपनीच्या कार्यालयात काही तरुण-तरुणी काम करतात. अभय सोनवणे हा तरुण गेल्या काही महिन्यांपासून एका तरुणीच्या मागे फिरत आहे. तरुणीने त्यास वारंवार समजाविल्यानंतरदेखील तरुण ऐकत नसल्याने तरुणीने याबाबत पोलिसातदेखील कळविले होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास माथेफिरू तरुण थेट कार्यालयात शिरला. काव्या (नाव बदललेले) आहे का? अशी विचारणा करीत दुसऱ्याच एका तरुणीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधू लागला. तरुणीने आरडाओरड करताच इतरांनी त्यास बाजूला करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला विरोध होत असल्याचे पाहून माथेफिरू तरुणाने कार्यालयातील वस्तूंची तोडफोड करीत काढता पाया घेतला.
पोलिसांनी घेतले ताब्यात
कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी याबाबत शहर पोलिसांना कळविले. शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तेजस मराठे, योगेश इंधाटे यांच्यासह कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी माथेफिरु तरुणाचा परिसरात शोध घेतला असता तो मिळून आला. तरुणाला शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आले. पोलीस ठाण्याच्या आवारात माथेफिरू तरुण आल्यानंतर त्याला तरुणीसह काही नागरिकांनी चांगलाच चोप दिला. नंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेत चौकशी केली. चौकशीत त्याने पोलिसांना अभय सोनवणे असे नाव सांगितले. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.