मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती आणि नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे. आतापर्यंत पूर परिस्थिती आणि दरड कोसळून अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला आहे. आता लोकांचा जीव महत्त्वाचा आहे यामुळे सर्व मनसैनिकांनी तात्काळ मदत करावी, तसेच तातडीची मदत पोहचेल अशी व्यवस्था करण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना केलं आहे.
राज ठाकरेंनी आपल्या ट्वीटर हँडलवरून हा संदेश प्रसारित केला आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना मदतीचं आवाहन केलं आहे. “माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो, महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे. त्यातल्या त्यात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. ह्या अवघड परिस्थितीमध्ये मी सर्व महाराष्ट्र सैनिकांना त्यांना जितकं जमेल, तितकी मदत त्यांनी पूरग्रस्तांना करावी, असं आवाहन करतो. आत्ता लोकांचा जीव महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर जसजसा पूर ओसरेल, तसा रोगराईचा धोकाही वाढू शकेल. तुम्ही त्यात लक्ष घालून अत्यंत तातडीनं योग्य ती मदत तिथे पोहोचेल असं पाहावं. काम करताना अर्थातच स्वत:ची काळजीही घ्यावी”, असा संदेश राज ठाकरेंनी या जाहीर पत्रात दिला आहे.
“महाराष्ट्रावरचं हे मोठं संकट आहे. त्याला तोंड देताना आपल्याकडून कुठलीही कुचराई होता कामा नये. जय महाराष्ट्र!” असं या पत्राच्या शेवटी त्यांनी नमदू केलं आहे.