नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पुढील महिन्यात राष्ट्रपतीपदाची निवडणूक होऊ घातली आहे. विरोधकांच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी दिल्लीत बोलावलेल्या बैठकीत काँग्रेस भाग घेणार आहे. यापूर्वी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार तुम्ही व्हावे, असा आग्रह धरला. मात्र, शरद पवार यांनी त्यास नकार दिला. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांकडून उमेदवार म्हणून उभे राहण्यास शरद पवार यांनी नकार दिला, अशी माहिती माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येचुरी, भाकपचे सरचिटणीस डी. राजा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, पी. सी. चाको यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी पवार यांनी आपण राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवणार नाही, असे त्यांना सांगितले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शरद पवार हे विरोधी पक्षांचे उमेदवार नसतील अशी माहिती मला देण्यात आली. अन्य नावांवर विचार करण्यात यावा, असेही सांगितल्याचे येचुरी म्हणाले.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दिल्लीत गेल्या आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांची त्यांनी बैठक बोलावली आहे. आगामी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी संयुक्तपणे रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक बोलावल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, शरद पवार यांनी या भेटीबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. ममता बॅनर्जी यांनी माझ्या दिल्लीतील निवासस्थानी भेट दिली. आपल्या देशातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली, असे शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवाराच्या सर्व सहमतीसाठी १५ जून रोजी दिल्लीत बैठक बोलावली आहे. राष्ट्रपतिपदासाठी १८ जुलैला निवडणूक होणार आहे.