नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गिरीश महाजन यांच्यासह भाजप नेत्यांना खोट्या खटल्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. यामुळे माजी मंत्री देशमुखांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या पेनड्राइव्हच्या प्राथमिक चौकशीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला. जळगावातील मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज लिमिटेड या संस्थेचा ताबा कुणाकडे असावा?, यावरून नीलेश भोईटे विरुद्ध अॅड. विजय पाटील यांच्या गटात वाद सुरू होते. यातच दोन्ही गटांकडून एकमेका विरुद्ध विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. याच प्रकरणात अॅड. विजय पाटील यांनी गिरीश महाजन यांच्यासह भोईटे गटातील काही सदस्यांच्या विरोधात रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिस ठाण्यात तीन वर्षांपूर्वी घडलेल्या कथित गुन्हाची फिर्याद सन २०२१ मध्ये नोंदवली होती.
तत्पूर्वी ही घटना पुण्यात घडली असल्यामुळे पुण्यात गुन्हा दाखल झाला पाहिजे व तीन वर्षांपूर्वीची घटना सांगण्यात येत असल्यामुळे त्याची आधी चौकशी झाली पाहिजे अशी भूमिका तत्कालिन पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी घेतली. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार असताना गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांनी एकाच आठवड्यात दोन वेळा मुंडे यांना फोन करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. देशमुख यांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात मोक्कांतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप आहे. खुद्द मुंढे व इतर काही अधिकाऱ्यांनी सीबीआयकडे तसा जबाब नोंदवला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख मला सातत्याने फोन करत होते, असं तत्कालीन प्रवीण मुंडे आपल्या जबाबात म्हणाले. सीबीआयने विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यात आता एसपींवर दबाव टाकला म्हणून अनिल देशमुख यांनासुद्धा आरोपी करण्यात आलं आहे. गिरीश महाजन यांच्यावर खोटा मोक्का गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आलं होतं. सीबीआयकडून या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरु आहे.
दरम्यान, माझ्यावर सीबीआयकडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता, न डगमगता मी भाजपच्या या दडपशाहीविरुद्ध लढण्याची खूणगाठ बांधली आहे, असे देशमुख यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.