चाळीसगाव (प्रतिनिधी) पोलीस असल्याची बतावणी करत दोन चोरट्यांनी सेवानिमित्त कर्मचाऱ्याचे दागिने लांबवून गंडवल्याची घटना खरजाई नाका ते स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.
शहरातील खरजाई रोडवरील श्रीकृष्ण नगरमधील अशोक हरी जाधव (वय ६८) हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. अशोक जाधव हे ३ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास बाजार करण्यासाठी घराबाहेर पडले. खरजई रोडवरील स्माशनभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याने जात असताना दोन जण दुचाकीवरून आले व त्यांनी जाधव यांना थांबवून पोलीस असल्याची बतावणी केली. त्यातील हेल्मेट घातलेल्या व्यक्तीने पोलीस असल्याचे सांगत त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन व हाताच्या बोटातील अंगठी काढण्यास भाग पाडले. त्यानंतर ते रूमालात गुंडाळून रूमाल जाधव यांच्याकडे दिला व त्यानंतर ते दोघे स्पोर्ट बाईकने निघुन गेले. दरम्यान, जाधव यांना शंका आल्याने त्यांनी रूमाल उघडून पाहिला असता त्यात सोन्याची चैन व अंगठी नसल्याचे स्पष्ट झाले. या दोघा भामट्यांनी सुमारे १५ हजार रूपयांची सोन्याची चैन व अंगठी असा ऐवज हातचलाखीने काढून फसवणूक करून पोबारा केला. याप्रकरणी अशोक जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दोघा भामट्याविरोधात विविध कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
	    	
 
















