छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) मॉर्निंग वॉकला चाललेल्या वृद्धेला दुचाकीवर आलेल्या दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करीत एवढे दागिने अंगावर घालून फिरू नका, कालच चाकू दाखवून महिलेचे दागिने लुटल्याची घटना घडली आहे, दागिने काढून पर्समध्ये ठेवा, असे म्हणत काढलेले दागिने पर्समध्ये ठेवताना पर्सच हिसकावून नेल्याची घटना शनिवारी सकाळी उल्कानगरी भागात घडली. भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.
सुनीता दत्तात्रय राजे (६०, रा. सिद्धी हाइट्स, उल्कानगरी) या सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या पत्नी असून, त्या कुटुंबीयांसह उल्कानगरी भागात राहतात. शनिवारी (दि. २६) सकाळी ८ वाजता मॉर्निंग वॉकसाठी उल्कानगरी येथून रोपळेकर हॉस्पिटलकडे जात होत्या. ८.४५ वाजता रोपळेकर हॉस्पिटलच्या समोर असलेल्या न्यूट्री व्हाइट दूध डेअरी येथे दूध घेण्यासाठी जात होत्या. त्यावेळी दोन दुचाकी त्या ठिकाणी आल्या. एका दुचाकीवरील दोन व्यक्ती डेअरीचे मालक राजू पेट्टी ऊर्फ अण्णा यांच्याशी बोलत होते. त्यावेळी दुसऱ्या दुचाकीवरील दोघे वृद्धेच्या जवळ आले.
दुचाकी चालविणाऱ्याच्या अंगात पांढरा शर्ट व खाकी पॅन्ट होती. तर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने टोपी घातली होती. दुचाकीचालकाने डोक्यावरील हेल्मेट काढून आणि तोंडाला लावलेला मास्क खाली ओढीत आहोत. आम्हाला वरिष्ठांच्या सूचना आहेत की, मॉर्निंग वॉक करताना दागिने घालून फिरू देऊ नका. कालच या परिसरात चाकू दाखवून एका बाईचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली आहे. तुम्ही तुमच्या अंगावरील दागिने तुमच्या पर्समध्ये सुरक्षित ठेवा. सुनीता राजे यांनी त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवत अंगावरील सोन्याचे दागिने, मंगळसूत्र, डाव्या हातातील बांगडी व पाटली काढून पर्समध्ये ठेवले. उजव्या हाताची सोन्याची बांगडी काढून पर्समध्ये ठेवली. मात्र, त्याच हातातील पाटली निघत नसल्याने त्या व्यक्तीने ती पाटली बळजबरीने काढून पर्समध्ये ठेवली.
त्यानंतर सुनीता राजे यांच्या हातातील पर्सच बळजबरीने हिसकावून दुचाकीवर बसून पळ काढला. त्याच वेळी डेअरीचे मालक अण्णा यांच्यासोबत बोलत असलेले दोघेही दुचाकीवर बसून निघून गेले. पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्यांनी दोन लाख रुपये किमतीच्या पाटल्या, दीड लाख रुपयांच्या दोन सोन्याच्या बांगड्या आणि दोन लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र असे एकूण साडेपाच लाख रुपयांचे दागिने लंपास केले. या प्रकरणी सुनीता राजे यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.