चाळीसगाव (प्रतिनिधी) नातेवाईक असून घराकुलाचे कागद कपाटात असल्याचे भासवत घरात घुसून अज्ञात भामट्याने कपाटातील लॉकर तोडून त्यातील १ लाख २० हजारांची सोन्याची पोत चोरून दुचाकीवरून पळ काढल्याचा खळबळजनक प्रकार तालुक्यातील तरवाडे पेठ येथे दिवसाढवळ्या घडला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरवाडे पेठ येथील विजय पद्माकर अमृतकार यांच्या मातोश्री व त्यांची लहान मुलगी घरात होते, तर इतर कुटुंबीय शेतात गेले होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अंदाजे २५ ते २८ वयाचा अनोळखी तरूण घरी आला. मी नांदेड येथून आलो असून तुमच्या सुनेचा नातेवाईक असून घरातून कागदपत्रे घेण्यास सांगितले आहे. तर ही कागदपत्रे कपाटात असल्याचे सांगून हा भामटा घरात घुसला. मात्र, कपाटाची चावी आपल्याजवळ नाही, असे विजय अमृतकार यांच्या आईने सांगितले. त्यानंतर भामट्याने लोखंडी रॉडने कपाटाचे लॉकर तोडून त्यातून सोन्याची ४ तोळ्याची पोत चोरून घराबाहेर लावलेल्या दुचाकीवरून पळ काढला. विजय अमृतकार यांच्या आई व मुलगी घरात दोघेच असल्याने घाबरल्यामुळे त्यांनी आरडाओरड केली नाही. तर भामटा पळून गेल्यावर त्यांनी शेजाऱ्यांना हा प्रकार सांगितला. तर घरातील सदस्य घरी आल्यानंतर कपाटातून १ लाख २० हजाराची सोन्याची पोत भामट्याने गायब केल्याचे समोर आले. हा प्रकार २५ रोजी दुपारी अडीच वाजता घडला. या प्रकरणी विजय अमृतकार यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.