नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील संत कालीचरण यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी एफआयआर दाखल केला. यावर कालीचरण महाराजांनी (Kalicharan Maharaj) महात्मा गांधींना (Mahatma Gandhi) शिव्या दिल्याचा आपल्याला कोणताही पश्चाताप नाही, असं म्हटलंय. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भगवान विष्णूचा अवतार देखील म्हटलंय.
एका वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात कालीचरण महाराज यांनी हजेरी लावली. यावेळी अँकरने त्यांना विचारले की, राष्ट्रपिता महात्मा गांधींना तुम्ही शिवीगाळ केली? हे खरे आहे का? प्रत्युत्तरादाखल कालीचरण म्हणाले, “मला गांधींना शिव्या दिल्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही. शिव्या रागाने बाहेर येतात, माझ्या मनातल्या वेदना जाग्या झाल्या, त्यामुळे मी ते बोललो.”
पंतप्रधान मोदी आणि सीएम योगी आदित्यनाथ भगवान विष्णूचा अवतार
कालीचरण म्हणाले की, “मी महात्मा गांधींना संत आणि राष्ट्रपिता मानत नाही. त्यांनी हिंदू धर्म आणि हिंदुत्वासाठी काय केले? एकच धर्म डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम केले. त्यांनी जनतेचा विश्वासघात करण्याचे कृत्य केले होते.” यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधींची पूजा करतात आणि तुम्ही त्यांना शिवीगाळ करत आहात? असं विचारलं असता “मी पंतप्रधान मोदी आणि सीएम योगी आदित्यनाथ यांना भगवान विष्णूचा अवतार मानतो,” असं ते म्हणाले.
माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, मला कोणताही पश्चाताप नाही
कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल दिलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. “गांधींना शिवीगाळ केल्याप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबद्दल मला कोणताही पश्चाताप नाही. देशाच्या पंतप्रधानपदासाठी सरदार पटेल यांना मते मिळाली होती आणि एकही मत नेहरूंना नव्हते, तरीही नेहरूंना पंतप्रधान का केले,” असे कालीचरण महाराज म्हणाले.















