नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पाचव्या आयुर्वेद दिवसाच्या निमित्ताने दोन आयुर्वेद संस्था देशाला समर्पित करणार आहेत. मंत्रालयाच्या मते, या दोन्ही संस्था देशातील आयुर्वेदाच्या प्रमुख आणि प्रतिष्ठित संस्था आहे. आयटीआरएला संसदेत कायद करुन महत्त्वाच्या राष्ट्रीय संस्थेचा दर्जा देण्यात आला आहे. तर जयपूरच्या आयएनएला यूजीसीद्वारे मानद विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे.
गुजरातच्या जामनगरमधील भारतीय आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन (आयटीआरए) आणि राजस्थानमधील जयपूरची राष्ट्रीय आयुर्वेद संस्था आज देशाला समर्पित केल्या जातील. आयुष मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. संसदेतील कायद्याद्वारे दर्जा मिळालेलं जामनगरचं आयटीआरए जागतिक स्तरावरील आरोग्य देखभाल केंद्र म्हणून काम करणार आहे. यामध्ये १२ विभाग, तीन क्लिनिकल प्रयोगशाळा आणि तीन संशोधन प्रयोगशाळांचा समावेश आहे. तसेच पारंपरिक औषधांच्या क्षेत्रात ही संस्था अग्रगण्य आहे. सध्या इथे ३३ संशोधन योजना सुरु आहेत. गुजरात आयुर्वेद विद्यापीठ परिसरातील चार आयु्र्वेद संस्था मिळून आयटीआरएची स्थापना करण्यात आली आहे. आयुष क्षेत्रातील ही पहिली संस्था आहे ज्याला राष्ट्रीय महत्त्वाचा दर्जा प्रदान केला आहे.
आयुष मंत्रालय २०१६ पासून दरवर्षी धनत्रयोदशीच्या निमित्ताने ‘आयुर्वेद दिवस’ साजरा करतं. यंदा आज म्हणजेच १३ नोव्हेंबर रोजी हा दिवस साजरा करण्यात येत आहे. यावर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हर्चुअल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा दिवस साजरा केला जाणार आहे. संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय आयुर्वेद संस्था (एनआयए) ला मानद विद्यापीठाचा दर्जा प्राप्त आहे. या विद्यापीठाला १७५ वर्षांचा वारसा आहे.
















