लखनऊ (वृत्तसंस्था) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी २५ डिसेंबरला शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यासह उत्तर प्रदेश भाजपचे कार्यकर्ते केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे पत्र घरोघरी जाऊन शेतकऱ्यांना देतील. तर २५ डिसेंबरला अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी संपूर्ण उत्तर प्रदेशातील शेतकर्यांच्या अडीच हजार चौपालशी जुळतील.
राज्यातील अडीच हजाराहून अधिक ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजप एक मोहीम राबवेल. यामध्ये पंतप्रधान मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेतकऱ्यांशी संपर्क साधतील. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना जोडणारा हा मेगा प्रोग्राम होणार आहे. एकट्या अवधमध्ये ३७७ ठिकाणी तर संपूर्ण उत्तर प्रदेशात अडीच हजाराहून अधिक ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. २५ डिसेंबरला उत्तर प्रदेशातल्या अडीच हजार ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसंच ते कृषी कायद्यांचं महत्त्व शेतकऱ्यांना सांगणार आहेत. २५ डिसेंबरला किसान सन्मान निधीही वितरित केला जाणार आहे. उत्तर प्रदेशात या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे. दरम्यान या कार्यक्रमावरुन विरोधक पुन्हा एकदा मोदींवर टीका करण्याची शक्यता आहे कारण दिल्लीच्या सीमेेवर पंजाब आणि हरयाणा या राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. कृषी कायद्यांना विरोध दर्शवत मागील २० दिवसांपेक्षा जास्त काळ हे आंदोलन सुरु आहे. अशात त्यांच्याशी संवाद साधण्याऐवजी पंतप्रधान उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे हा मुद्दा पुढे करुन विरोधक आक्रमक होऊ शकतात.
किसान संवादाच्या दुसर्या दिवसापासून भाजप नवीन कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ मोहीम राबवेल. उत्तर प्रदेशात २६ आणि २७ डिसेंबरला रोजी भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांचं पत्र देऊन आणि शेतकर्यांच्या हितासाठी केलेल्या कामांची माहिती देतील. यासह झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन केंद्राच्या योजनांचीही माहिती देतील.