श्रीनगर (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या वर्षीही दिवाळीचा सण देशसंरक्षणार्थ तैनात असणाऱ्या जवानांसोबत साजरा केला. नियंत्रण रेषेनजीक असणाऱ्या नौशेरा येथे ते उपस्थित होते. नौशेरा सेक्टवर हल्ला झाला, घुसखोरीही झाली पण इथं असणाऱ्या वीरांनी सैन्याची ताकद दाखवून देत शत्रूला चितपट केल्याचं सांगत पंतप्रधानांनी नौशेरा आणि देशासाठी प्राण त्यागणाऱ्या सैन्यदल जवानांची नावं घेत त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला.
यावेळी पंतप्रधानांनी नौशेरात जवानांशी संवाद साधला. नौशेरामध्ये तैनात जवानांच्या शौर्याचं वर्णन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणींना उजाळा दिला. उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या सीमेत घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नौशेरा सेक्टरमध्ये तैनात जवानांच्या कौशल्याचं कौतुक केलं. “सर्जिकल स्ट्राईकमध्ये इथल्या ब्रिगेडनं जी भूमिका निभावली, ती प्रत्येक भारतीयाला गर्व वाटणारी आहे”, असं ते म्हणाले. “सर्जिकल स्ट्राईकनंतर इथे अशांती निर्माण करण्याचे अनेक कुत्सित प्रयत्न झाले, आजही होतात. पण प्रत्येक वेळी इथे तोडीस तोड उत्तर दिलं जातं. असत्याविरुद्ध या मातीत एक स्वाभाविक प्रेरणा आहे. असं म्हणतात, की पांडवांनीही अज्ञातवासाच्या दरम्यान आपला काही काळ इथे घालवला होता”, असं पंतप्रधान म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईकच्या दिवशीच्या आठवणींना उजाळा दिला. “तो दिवस कायम माझ्या लक्षात राहील. मी ठरवलं होतं की सूर्यास्तापूर्वी सर्वजण परत यायला हवेत. मी प्रत्येक क्षण फोन वाजण्याची वाट पाहात होतो. माझा शेवटचा जवान पोहोचला का हे पाहात होतो. आणि आपलं कोणतंही नुकसान न होता आपले जवान यश मिळवून परत आले”, असं पंतप्रधान म्हणाले.