नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदी केदारनाथमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदींनी यावेळी रुद्राभिषेक करत भक्तीभावाने बाबा केदारनाथांची पुजा केली. आद्य शंकराचार्यांच्या समाधी, मूर्तीचं मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. ८२ तीर्थक्षेत्रांवर आज कार्यक्रम होणार आहे. केदारनाथमध्ये २५० कोटींच्या विकासकामांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे.
केदारनाथच्या या दौऱ्याच्या निमित्ताने मोदी एका महिन्यामध्ये दुसऱ्यांदा उत्तराखंडला गेले आहेत. मोदी आज ज्या योजनांची घोषणा करणार आहे त्यामध्ये आदि गुरु शंकराचार्यांच्या समाधीसंदर्भातील योजनांचाही समावेश आहे. मोदींच्या हस्ते आदि गुरु शंकराचार्यांच्या प्रतिमेचंही अनावरण केलं जाणार आहे. मोदी यांच्या हस्ते केदारपुरी पुनर्विकासच्या दुसऱ्या टप्प्यामधील प्रकल्पांचे भूमिपूजन केलं जाणार असल्यांचही सांगण्यात येत आहे. या योजना २५० कोटी रुपयांच्या आहेत. २०१४ साली पंतप्रधान झाल्यानंतर मोदी अनेकदा केदारनाथला आले आहेत. मागील वर्षी कोरोनामुळे ते केदारनाथला गेले नव्हते.
मात्र आता कोरोना परिस्थिती नियंत्रणामध्ये आल्यानंतर ते पुन्हा एकदा केदारनाथच्या दर्शनाला गेले आहेत. मोदी केदारपुरी पुन:निर्माण प्रकल्पांमध्ये स्वत: अनेक गोष्टींकडे लक्ष देऊन आहेत. ६ नोव्हेंबरपासून हिवाळ्यामुळे केदारनाथचे कपाट बंद होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. केदारनाथ मंदिराचे पुजारी बागीश यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदीजी महा रुद्राभिषेक करणार असून राष्ट्र कल्याणासाठी प्रार्थना करणार आहे. मोदींच्या हस्ते आदी शंकराचार्यांच्या प्रतिमेचंही अनावरण केलं जाणार आहे. मंदिराला फुलांची विशेष सजावट करण्यात आलीय, असंही पुजाऱ्यांनी सांगितलं.