नवी दिल्ली (वृत्तसंस्था) विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला भीषण आग लागली. या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आपत्कालीन मदतनिधीमधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येक दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन यासंदर्भातील घोषणा करण्यात आलीय. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून विरार येथील रुग्णालयाला लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत देण्यास मंजूरी दिलीय. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्यांना ५० हजारांची मदत देण्याचाही निर्णय घेण्यात आलाय,” असं ट्विट पीएमओच्या अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदींनी घडलेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. “विरारमधील रुग्णालयामध्ये आग लागण्याची घटना दु:खद आहे. आपल्या नातेवाईकांना गमवलेल्यांचं मी सांत्वन करतो. जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होवो, अशी इच्छा व्यक्त करतो,” असं मोदींनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
“विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आग विझवणे व इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले,” अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत दिली आहे.
“उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये याकडे लक्ष देत त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या खासगी रुग्णालयात अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत,” अशी माहिती देण्यात आली आहे.
एसीचा स्फोट झाल्याने आग
विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेलेली आग ही एसीचा स्फोट झाल्याने लागली असल्याची माहिती डॉक्टर दिलीप शाह यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. रुग्णालयात सेंट्रलाइज एसी असून दोनच मिनिटात आग सगळीकडे पसरली अशी माहिती त्यांनी दिली आहे. रात्री ३ वाजता लागलेल्या आगीनंतर रुग्णालयात धावपळ सुरु झाली होती. आयसीयूमध्ये एकूण १७ रुग्ण होते. यामधील चौघे जण जे चालू शकत होते त्यांनी स्वत:ची सुटका करुन घेतली. मात्र इतर रुग्ण आपला जीव वाचवू शकले नाहीत आणि आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. आगाची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले होते. घटनास्थळी पोहचल्यानंतर काही वेळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं आहे.
रुग्णालयात एकूण ९० रुग्ण दाखल होते. आग लागल्यानंतर ऑक्सिजनवर असणाऱ्या तसंच गंभीर प्रकृती असणाऱ्यांना इतर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. २१ रुग्णांना इतरत्र हलवण्यात आलं असून यामध्ये चार महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालयाने सांगितलं आहे.