नाशिक (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील स्वयंम पाटील याने क्रिडा प्रकारातील स्विमिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या कामगिरीबद्दल आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२२ देवून स्वयंम पाटील यांस गौरविण्यात आले आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्यपप्रणालीद्वारे आयोजित प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२२ वितरण कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी दूरदृष्यपप्रणालीद्वारे उपस्थित होत्या. तर जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपायुक्त महिला व बालविकास चंद्रशेखर पगारे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अजय फडोळ, जिल्हा क्रिडा अधिकारी पल्लवी धात्रक, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गणेश कानवडे, पर्यविक्षा अधिकारी प्रभाकर गावित, पुरस्कार प्राप्त स्वयंम पाटील यांची आई विद्या पाटील व वडील विलास पाटील आदी उपस्थित होते.
शैक्षणिक क्षेत्र, क्रीडा, कला आणि संस्कृती, शौर्य, समाजसेवा आणि नवतंत्रज्ञान अशा सहा क्षेत्रात अनन्य साधारण कामगिरी करणाऱ्या बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येतात. देशातील २९ मुलांना आज प्रातिनिधीक स्वरूपात दूरदृयश्प्रणालीद्वारे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील स्वयंम पाटील या १४ वर्षीय बालकाने एलिफंट गुफा ते गेट वे ऑफ इंडिया हे १४ किलोमीटर खाडी ४ तास ९ मिनीटांत पोहून पार केल्याचा विक्रम स्वयंम पाटीलने केला आहे. याची दखल घेत केंद्र सरकारने त्यास क्रीडा क्षेत्रातील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२२ देवून सन्मानीत केले. यावर्षी प्रथमच कानपूर आयआयटीमार्फत ब्लॉकचेन माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भ्रमणध्वनीवर डिजिटल प्रमाणपत्र व एक लाख रूपये रोख रक्कम पुरस्कार प्राप्त स्वयंम पाटील यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.
स्वयंम पाटील यास यापूर्वी देखील लिमका बुक ऑफ रेकॉर्ड २०१७, दिव्यांगजन सशक्तिकरण हेतू राष्ट्रीय पुरस्कार २०१८, वंडर बुक ऑफ इंटरनॅशनल रेकॉर्ड २०१८, जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२० तसेच वर्ल्डस् रेकॉर्ड इंडिया अशा पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. दूरदृष्यप्रणालीद्वारे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्वयंम पाटील व त्याचे आई वडील यांचा सत्कार करून अभिनंदन केले.