नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रधानमंत्रीजी, जनतेला लूटायचे बंद करा, आपल्या मित्रांना पैसे द्यायचे बंद करा आणि आत्मनिर्भर व्हा, अशा शब्दात पेट्रोल आणि डिझेलवरील संभाव्य एक्साईज ड्यूटी वाढवण्याच्या मुद्यावरून कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
कोरोनामुळे देशावर आलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार आता विविध योजना आखत आहे. त्यापैकी एक म्हणजे पेट्रोल आणि डिझेलवरच्या एक्साईज ड्यूटीत वाढ करण्याची प्रक्रिया आहे. सरकारने हे पाऊल उचलले तर एका वर्षात ६० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. जर चालू आर्थिक वर्षाचा विचार केला तर किमान ३० हजार कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत जमा होणार आहेत. याच मुद्यावरून राहुल गांधीनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, प्रधानमंत्रीजी, जनतेला लूटायचे बंद करा, आपल्या मित्रांना पैसे द्यायचे बंद करा आणि आत्मनिर्भर व्हा.