कराड (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले. उद्धव ठाकरे यांनी घेतलेला वीकेंड लॉकडाऊनचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक असल्याचे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाची लस घेतली. यावेळी ते बोलत होते.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वीकेंड लॉकडाऊन लावण्याचा घेतलेला निर्णय सर्वांशी सल्लामसलत करुन घेतला आहे. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांचे हाल होणार नाहीत. हा निर्णय सर्वसामान्यांना दिलासादायक असल्याचे मत चव्हाणांनी व्यक्त केले. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडच्या वेणूताई उपजिल्हा रुग्णालयात कोरोना प्रतिबंध लस घेतली.
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले होते?
राज्यात लॉकडाऊन करायचा की नाही याबाबत सत्ताधाऱ्यांमध्ये मत-मतांतरं असल्याचं म्हटलं जात होतं. त्यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं होतं. आधी रोजगाराचे पैसे थेट खात्यावर जमा करा, मग लॉकडाऊनचं बघा, असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला दिला होता. तसेच चव्हाण यांनी ठाकरे सरकारकडे पाच मागण्याही केल्या होत्या.
“केंद्राने हाफकिनला कोरोना लस उत्पादनासाठी परवानगी द्यावी. भारत बायोटेकने साधन सामुग्री आणि लसीचं टेक्नीक पुरवावं. केंद्राने अजून परवानगी दिली नाही, ती तातडीने द्यावी. लॉकडाऊन झाल्यावर सर्वसामान्यांवर नुकसान सहन करण्याची वेळ येईल. साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय, पण तो स्वीकारणे नुकसानीचं आहे. एप्रिल हा काळजी घेणारा महिना आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं, गर्दी करु नये, मास्क वापरावं आणि प्रशासनाला मोठा निर्णय घेण्यासाठी भाग पाडू नये.” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते.