नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शांतता भंग करणे आणि जमावबंदीच्या १४४ या कलमाचे उल्लंघन करणे या आरोपाखाली काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना सितापूर जिल्ह्यातील हरगावमधून अटक केली आहे. प्रियांका गांधींच्या अटकेनंतर उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
प्रियांका गांधींना काहीच वेळात कोर्टात दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाऊ शकते. याआधी प्रियांका गांधींनी ट्विटरवर लखीमपूर हिंसाचाराशी संबंधित व्हिडिओ शेअर करुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले. पोलिस हवं तेव्हा मला अटक करु शकतात पण मी शेतकरी कुटुंबांना भेटल्याशिवाय परतणार नाही, असा निश्चय बोलून दाखवत त्यांनी पोलिसांना आव्हान दिलं होतं.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी इथं रविवारी शेतकऱ्यांसह ८ जणांना चिरडल्यानंतर देशभरात संतापाचा उद्रेक आहे. कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडण्यात आलं. यानंतर प्रियांका गांधी लगोलग पीडित कुटुबांच्या भेटीसाठी निघाल्या. परंतु उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना लखीमपूरला जाण्यास मनाई करुन त्यांना ताब्यात घेतलं.